Crime News

Crime News : चाळीसगाव शहरात तब्बल ५० किलो गांजा जप्त

गुन्हे

सिद्धार्थ डोंगरे | चाळीसगाव शहर प्रतिनिधी

अवैधरित्या गांजाची वाहतूक करणाऱ्या वाहनावर शनिवार, दि. १५ रोजी चाळीसगाव पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. या कारवाईत वाहनातून १० किलो तर घरातून ४० किलो असा तब्बल ५० किलो गांजा जप्त करण्यात आला असून एकास अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी चाळीसगाव गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (As many as 50 kg of ganja seized in Chalisgaon city)

चाळीसगाव शहरातील शिक्षक कॉलनी परिसरात गांजाची अवैधरित्या वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार पो.नि. पाटील यांनी पथक तयार करून कारवाईच्या सूचना केल्या. त्यानुसार पथकाने शनिवार, दि. १५ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास सापळा रचून गांजाची वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई केली. यावेळी वाहनातून १० किलो गांजा जप्त करण्यात आला.

घरात लपवला होता गांजा
वाहनावर कारवाई केल्यानंतर पथकाने अशोक भरतसिंग पाटील (वय-५४, रा. शिक्षक कॉलनी, चाळीसगाव) या संशयिताला अटक केली. त्याला खाकी दाखविताच त्याने घरातून ४० किलो ३१५ ग्रॅम गांजा काढून दिला. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत वाहनातून १० किलो व घरातून ४० किलो ३१५ ग्रॅम असा ५० किलो ३१५ ग्रॅम वजनाचा व १० लाख ६ हजार रुपये किमतीचा गांजा व वाहन असा एकूण २२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या पथकाने केली कारवाई
चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील, निवासी नायब तहसीलदार जितेंद्र धनराळे, फौजदार सुहास आव्हाड, हवालदार सुभाष घोडेस्वार, राहुल सोनवणे, विनोद भोई, पोलीस नाईक महेंद्र पाटील, कॉन्स्टेबल आशुतोष सोनवणे, ज्ञानेश्वर पाटोळे, पवन पाटील, विजय पाटील, ज्ञानेश्वर गीते, मनोज चव्हाण, राकेश महाजन, रवींद्र बच्छे, महिला शिपाई स्नेहल मांडोळे आदींच्या पथकाने ही केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड व कॉन्स्टेबल उज्वलकुमार म्हस्के करीत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत