Rajya Balnatya Spardha : रसिकांना हसवून लोटपोट करत राज्य बालनाट्य स्पर्धेचा समारोप

महाराष्ट्र विशेष

जळगाव : सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने जळगाव केंद्रावर आयोजित २० व्या राज्य बालनाट्य (Balnatya Spardha) स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा समारोप शुक्रवारी (दि.१९) ‘मरी गई’ या नाटकाने झाला. अस्सल अहिराणी संवादातील या नाटकाने रसिकांना हसवून लोटपोट केले तर रसिकांनीही टाळ्यांचा खळखळात करत बालकांच्या कलेचे कौतुक केले.

शहरातील छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृह येथे गेल्या पाच दिवसांपासून ही स्पर्धा सुरू होती. या पाच दिवसात तब्बल तीस नाटकांचे या ठिकाणी सादरीकरण करण्यात आले. शैक्षणिक, सामाजिक, मोबाईलचा विळख्यात अडकलेल्या बालकांच्या, अनाथ तसेच दिव्यांग मुलांच्या व्यथा यासारख्या अनेक विषयाचा वेध या नाटकांमधून घेण्यात आला. (Balnatya Spardha) स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी ६ नाटकांचे सादरीकरण करण्यात आले.

स्पर्धेच्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नाट्यपरिषदेच्या नियामक मंडळाच्या सदस्य गीतांजली ठाकरे, ज्येष्ठ रंगकर्मी चिंतामण पाटील, स्पर्धेचे समन्वयक ईश्वर पाटील आदी उपस्थित होते. यावेळी बोलतांना गीतांजली ठाकरे म्हणाल्या की, बालनाट्य स्पर्धेला (Balnatya Spardha) मी नेहमी आणि आवर्जून उपस्थित राहते. कारण मोठे झाल्यानंतर ज्या गोष्टी आम्ही विसरतो, त्या या बाल कलाकारांकडून, नाटकातून शिकायला मिळत असल्याचे त्या म्हणाल्या. आपण कितीही मोठे झालो तरी ज्येष्ठांपुढे आपण लहान असल्याचेही त्या म्हणाल्या. तर जळगावात बालरंगभूमी निर्माण व्हावी, हे माझं स्वप्न होतं. आता हे स्वप्न पूर्ण होतांना दिसत असल्याचे ज्येष्ठ रंगकर्मी चिंतामण पाटील म्हणाले.

आळींबाच्या बेटावर : एका आदिवासी राज्याच्या विळख्यात सापडलेल्या दोन विद्यार्थ्यांची कथा या नाटकात (Balnatya Spardha) दाखविण्यात आली आहे. ही दोन मुले आपल्या हुशारीने स्वतःची सुटका करून घेतात शिवाय राजाला फसविणाऱ्या त्यांच्या प्रधानाचा भांडाफोड देखील करतात, असे यात दाखविण्यात आले आहे. धुळे येथील लोकमंगल कलाविष्कार सहकारी संस्थेने या नाटकाचे सादरीकरण केले.

विधी : धुळे येथील स्त्री शिक्षण संस्थेच्या कमलाबाई शंकरलाल कन्या शाळेने सादर केलेल्या या नाटकात (Balnatya Spardha) मतिमंद मुलींच्या आयुष्यावर भाष्य करण्यात आले आहे. त्यांचे बालगृहातील आयुष्य, १८ वर्षावरील अनाथ मतिमंद मुलींसाठीची व्यवस्था, अशा विविध समस्या या नाटकातून मांडण्यात आल्या आहेत.

बेला : भारतीय स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या भाऊ, बहीण आणि बेला नावाच्या एका मुलीची कहाणी या नाटकात (Balnatya Spardha) दाखविण्यात आली आहे. जे छुप्या पद्धतीने त्यांच्याशी लढतात. संघटन उभे करतात. मात्र, ब्रिटिशांच्या गोळीबारात छातीवर गोळी झेलत बेला आणि तिचे मामा व त्यांचे सहकारी शहीद होतात. असे या नाटकात दाखविण्यात आले आहे. भुसावळ येथील स्नेहयात्री प्रतिष्ठानने या नाटकाचे सादरीकरण केले.

मरी गई : मरी नावाचे बकरीचे पिल्लू हरविते आणि त्याला शोधण्यासाठी भाऊ, बहीण आणि त्यांचे मित्र जीवाचे रान करतात आणि आहे त्या सर्व क्लृप्त्या वापरून शेवटी त्याचा शोध घेतात. असे या नाटकात (Balnatya Spardha) दाखविण्यात आले आहे. अहिराणी भाषेवरील या नाटकाने रसिकांना खळखळून हसविले. समर्पण संस्था संचलित एस. एल. चौधरी प्राथमिक विद्यालयाने या नाटकाचे सादरीकरण केले.

आम्हीही आहोत निराळे या नाटकाचे (Balnatya Spardha) सादरीकरण भुसावळ येथील उत्कर्ष कलाविष्कार संस्थेने तर एलियन्स द ग्रेट या नाटकाचे सादरीकरण वरणगाव येथील इरा इंटरनॅशनल स्कूलने केले.

सांस्कृतीक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे प्रधानसचिव विकास खारगे, संचालक विभीषण चवरे, अधीक्षक मिलिंद बिरजे यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे समन्वयक म्हणून ईश्वर पाटील यांनी काम पाहिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत