Ganesh Murti

नंदुरबार जिल्ह्यात गणेश मूर्ती बनवण्याचं काम अंतिम टप्प्यात

विशेष

कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने गणेश मूर्ती 30 टक्क्याने महाग होणार

शहादा प्रतिनिधी : नितीन सावळे

शहादा :- गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. बाप्पांच्या आगमनाची सर्वच जण आतुरतेने वाट पाहत आहेत. कोरोना काळात असलेले निर्बंध आणि गणेश मूर्तींच्या उंचीवरील मर्यादा यामुळे गणेश मूर्ती बनवणाऱ्या कारागिरांवर मोठ्या आर्थिक संकट आले होते.मात्र यावर्षी सरकारने गणेशमूर्तींच्या उंचीची मर्यादा उठवल्याने गणेश मूर्तींना मोठी मागणी आहे. नंदुरबार शहरात गणेश मूर्ती बनवणारे लहान मोठे 100 कारखाने असून हजारो गणेश मूर्ती साकारल्या गेल्या आहेत. सात इंचापासून तर 22 फुटापर्यंत उंचीच्या मूर्ती तयार झाल्या असून यावर्षी गणेशमूर्तींच्या किमतीत 30 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.

पेणनंतर नंदुरबारच्या गणेशमूर्तींना बाजारात मोठी मागणी असते गुजरात मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या विविध भागात नंदुरबारमधून गणेश मूर्ती जात असतात. यावर्षी मूर्ती बनवण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ झाली असून त्यामुळे गणेशमूर्तींच्या किमतीत तीस टक्क्यांनी वाढणार आहेत. तर दुसरीकडे गणेश मूर्तीच्या उंचीवरील निर्बंध सरकारने उठवल्याने सार्वजनिक मंडळाच्या वतीने मोठमोठ्या गणेश मूर्ती यांची मागणी वाढली आहे अशी माहिती मूर्तिकार नारायण वाघ यांनी दिले आहे.

सार्वजनिक गणेश मंडळाच्या मोठ्या मूर्तींची बुकिंग सुरू झाली आहे. मंडळाचे कार्यकर्ते महाराष्ट्राच्या विविध भागातून आणि शेजारील गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यातून नंदुरबार येथील गणपती बनवणाऱ्या कारखान्यांमध्ये येत असून आतापासूनच आपल्या मंडळासाठीच्या मूर्ती बुक करून घेत आहेत . यावर्षी गणेशमूर्तींच्या किमतींमध्ये 30 टक्के पेक्षा अधिकची वाढ होणार असल्याने लहान मोठ्या सार्वजनिक गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांचा हिरमोड होत आहे 

गणेशभक्तांना गणेशोत्सवाचे वेध लागले असून शहरातील मुख्य ठिकाणी गणेश मूर्ती केंद्रही थाटले आहेत. तर ढोल पथकांची जय्यत तयारी सुरू आहे. पेण तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या गणेशमूर्तींना परदेशात मॉरीशिअस, थायलंड, ऑस्ट्रेलिया, युरोप सारख्या अनेक देशात मागणी असल्याने दरवर्षी 25 ते 30 हजार गणेशमूर्ती रवाना करण्यात येतात. गणेशमूर्तींच्या दरात वाढ झाली असताना भाविकांमधील गणेशोत्सवाचा उत्साह कायम आहे.

पीओपीच्या नियमांबाबत मोठा दिलासा

गणेशमंडळांना पीओपीच्या नियमांबाबत मोठा दिलासा मिळाला आहे. पीओपीला पर्याय सुचवण्याबाबतची मार्गदर्शक तत्व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून अद्यापही जाहीर करण्यात आलेली नाहीत, त्यामुळे 4 फुटांवरील मूर्तींसाठी पीओपीचा वापर करता येणार आहे. मात्र चार फुटांपेक्षा कमी उंच मुर्तींसाठी शाडूची माती बंधनकारक असणार आहे. दरम्यान, मूर्तीकारआणि मूर्ती विक्रेते-साठवणूकदारांना ‘एक खिडकी’ पद्धतीनं ऑनलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत