India Ice Hockey Team : कॅनडाच्या खेळाडूंना प्रशिक्षित करतोय जळगावचा तरुण

भारत विशेष

वयाच्या २४ व्या वर्षी घातली गवसणी; भारतीय आईस हॉकी संघाच्या (India Ice Hockey Team Vice Captain) उपकर्णधारपदापासून ते कॅनडात कोच होण्यापर्यंतचा विशाल जवाहरानी यांचा प्रेरणादायी प्रवास

जळगाव : वय वर्ष ३ असताना आजीने पायात स्केट घालून तयार केले. या वयात अंगात असलेली स्फूर्ती पाहून प्रशिक्षकांनी देखील जिद्दीने शिकविले. या खेळात पारंगत झाल्यानंतर वयाच्या ९ व्या वर्षी पहिली राष्ट्रीय स्पर्धा जिंकली. २०१७ मध्ये भारतीय आईस हॉकी ज्युनियर संघाचा उपकर्णधार बनून मलेशियामध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले. २०१८ मध्ये दक्षिण कोरियात झालेल्या सामन्यांमध्ये भारतीय संघाला पहिले कांस्य पदक मिळवून दिले. त्यानंतर आता कॅनडातील आइस हॉकीतील नंबर १ च्या सेंट अँड्रु महाविद्यालयात प्रशिक्षक म्हणून कार्य करीत आहे. ही प्रेरणादायी कहाणी आहे वयाच्या २४ व्या वर्षी आकाशाला गवसणी घालणाऱ्या जळगाव येथील व भारतीय आईस हॉकी संघाचे उपकर्णधार (India Ice Hockey Team Vice Captain) विशाल जवाहरानी यांची.

विशाल यांनी शनिवार (दि.१३) रोजी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी त्यांचा प्रेरणादायी प्रवास सगळ्यांसमोर उलगडला. विशाल म्हणाले की, जगात सर्वत्र तापमान सारखे नसते ही खरी गोष्ट आहे. मात्र, भारतातही तापमान कमी अधिक प्रमाणात आढळते. त्यात आईस हॉकीसारख्या खेळात प्रावीण्य मिळविल्यास या खेळात उज्ज्वल भविष्य आहे. (A bright future even in a sport like ice hockey with hard work)

पुढे बोलतांना जवाहरानी म्हणाले की, २००२ मध्ये ३ वर्षांचा असताना आजी प्रेमा जवाहरानी यांनी प्रथम स्केटिंगचे धडे दिले. त्यांनी स्वतःहून स्केटिंगची लेस बांधून मला तयार केले. त्यानंतर प्रशिक्षक विशाल मोरे, संजय पाटील यांनी स्केटिंग शिकल्यानंतर हळूहळू या खेळात पारंगत होत गेल्याचे त्यांनी सांगितले. २००९ मध्ये वयाच्या ९ व्या वर्षी पहिली राष्ट्रीय स्पर्धा जिंकली. २००२ ते २०१५ या कालावधीमध्ये जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीयस्तरावर अनेक पदके जिंकल्याचेही ते म्हणाले.

२०१७ मध्ये टीम इंडियाचा उपकर्णधार

२०१५ मध्ये अमेरिकेत जाऊन आईस हॉकी बघितल्यानंतर या खेळाविषयी आणखी आकर्षण निर्माण झाले. त्यानंतर खेळाचे बारकावे शिकून २०१७ मध्ये भारतीय ज्युनिअर संघाचा उपकर्णधार बनून मलेशियामध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले. २०१८ साली इटली आणि दक्षिण कोरियामध्ये इनलाइन हॉकीसाठी खेळलो. २०१८ मध्ये भारतीय संघाला पहिले कांस्य पदक दक्षिण कोरियात प्राप्त करून देण्यात सिंहाचा वाटा असल्याचेही ते अभिमानाने सांगतात.

२०१६ ते  ते २०२३ पर्यंत अनेक सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदके प्राप्त केली असून या खेळात प्राविण्य मिळविल्यानंतर २०२३ मध्ये कॅनडाच्या नंबर १ च्या सेंट अँड्रु कॉलेजमध्ये आईस हॉकीचे प्रशिक्षण देणारा भारताचा पहिला आइस हॉकी खेळाडू ठरल्याचे ही विशाल सांगतात. आता भारताचा आइस हॉकी अँबेसेडर आणि पायनियर बनण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. आईस हॉकी हा खेळ वैशिष्ट्यपूर्ण असून या खेळामध्ये उज्ज्वल भविष्य असून या खेळाकडे वळल्यास अनेक संधी देखील मिळू शकतात असेही त्याने सांगितले.

स्केटिंग शिकत असताना पडत-झडत सुरुवात केल्याचे मला आठवते. जिल्हा असेल किंवा राज्य किंवा राष्ट्रीयस्तर यापर्यंत पोहोचण्यासाठी मोठी मेहनत घेतली. मेहनतीने या उंची पर्यंत पोहचलो, याचा मला अभिमान आहे. आज भारत देशासाठी खेळत असल्याचा मला गर्व वाटत असल्याचेही विशाल यांनी सांगितले.

आजी आजोबांसह कुटुंबियांचे भक्कम पाठबळ
विशाल जवाहरानी याला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचण्यासाठी आजी प्रेमा जवाहरानी, आजोबा शीतलदास जवाहरानी, वडील विनोद जवाहरानी, आई उषा जवाहरानी, काका राजेश जवाहरानी व काकी सोनल जवाहरानी यांच्यासह कुटुंबाने दिलेल्या भक्कम पाठबळावर आज आईस हॉकीचा उपकर्णधार बनलो. आता भारतीय संघाचा (Team India) ब्रँड अँबेसेडर बनण्याच्या दिशेने त्याची वाटचाल सुरु आहे.

परिश्रम घ्या… यश नक्कीच…

आपल्या देशाच्या उपकर्णधारपदी निवड होणे खूप आनंददायी होते. आंतरराष्ट्रीयस्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणे हे जवाहरांनी कुटुंबीयांसह जळगाव जिल्हा वासीयांसाठी अभिमानास्पद आणि गौरवास्पद बाब आहे. यश गाठायचे असेल तर कठोर परिश्रम घ्या आणि पुढे चालत राहा… यश नक्कीच मिळेल… असा संदेश विशाल जवाहरानी यांनी खेळाडूंना दिला आहे.

यांचे मिळाले सहकार्य व मार्गदर्शन
भारत इनलाइन हॉकीसाठी अमित शर्मा, कोच विली (इटली), कोच निकोला (इटली), ग्रेट वैली हायस्कूल कोचिंग स्टाफ, भारत आइस हॉकीसाठी कोच आशु सिंह, अमित बेलवाल, मुष्टक गिरी, मार्गदर्शक हरजिंदर सिंह जिंदी, जगराज सिंह साहने, कोच डेनिस (रूस), कोच हिमानी त्यागी (पुणे), डॉ. आदित्य खाचणे ,  सेंट अँड्रु कॉलेजचा कोचिंग स्टाफमधील कोच डेविड मैनिंग, केविन गेट, कोच जेफ ब्रेना, कोच एंड्रयू, डॉ. नताली, रोब लालोन्डे (बटेन्जचे मालक), एंथोनी (ब्लेडटेकचे मालक),  मार्टिन हंटर,  फ्रेड पेरोन (हॉकी विदाउट बॉर्डर्स) आदींचे सहकार्य आणि मार्गदर्शन मिळाल्याचे विशाल जवाहरानी सांगतात.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत