Rajya Balnatya Spardha : बाल कलाकारांनी नाटकातून घेतला विद्यार्थी, बालकांच्या प्रश्नांचा ठाव

Blog

जळगाव : सांस्कृतीक कार्य संचालनालयाच्यावतीने शहरातील छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या राज्य बालनाट्य (Rajya Balnatya Spardha) स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी ७ नाटकांचे सादरीकरण करण्यात आले. एका पेक्षा एक सरस विषय घेवून सादर झालेल्या नाटकांनी काही महत्त्वाच्या सामाजिक विषयात हात घालत रसिकांना खिळवून ठेवले.

राज्य बालनाट्य स्पर्धेच्या (Rajya Balnatya Spardha) दुसऱ्या दिवसाची सुरुवात प्रांजल पंडित लिखित आणि चंद्रकांत कुमावत दिग्दर्शित फुपाखरू या नाटकाने झाली. शिरसोली येथील बारी समाज माध्यमिक विद्यालयाच्या बाल कलाकारांनी हे नाटक सादर केले. चार मैत्रिणींच्या ‘काय खेळ खेळायचा’ या विचारातून आपापली स्वप्ने सांगण्याची संकल्पना सुचते. एक-एक करून त्या मैत्रिणी आपापले स्वप्न व त्या मागील कहाणी सांगू लागतात. आणि येथून सुरू होते फुलपाखरुची खरी कहाणी. प्रत्येक बालमनात खूप गोष्टी असतात, त्यांची प्रत्येकाची आपली स्वप्ने असतात. अशाच एका वेगळ्या आणि स्वतंत्र स्वप्नाची ही गोष्ट आहे.

परी : जामनेर येथील लोकरंजन संस्थेने सादर केलेल्या परी या नाटकाच्या माध्यमातून ‘मासिक पाळी’ या विषयावर भाष्य करण्यात आले आहे. अनेक महिला आजही या विषयावर बोलणे टाळतात. मात्र, या विषयाकडे दुर्लक्ष न करता महिलांनी मग त्या कोणत्याही क्षेत्रात किंवा पदावर असोत… जसे की, विद्यार्थिनी, शिक्षिका, मैत्रीण. सर्वांनी या विषयावर मनमोकळे पणाने बोलावं, बालपणीच मुलींना याबाबत माहिती द्यावी, असा संदेश या नाटकातून देण्यात आला आहे.

कॉपी बहाद्दर : जळगाव येथील खान्देश लोकरंग फाउंडेशनने जीवनात शॉर्टकट पद्धतीने पुढे जाणाऱ्या व या शॉर्टकट पद्धतीमुळे कसे नुकसान होते, हे दाखविण्याचा तसेच चांगला आदर्श विद्यार्थी अभ्यास केल्यानेच घडतो, हा संदेश कॉपी बहाद्दर या नाटकातून दिला आहे.

राक्षस : लहान मुलांना अभ्यासाची खूप भीती वाटते. मुलांच्या मनातील ही भीती घालविण्यासाठी स्वतः पुस्तके अस्तित्वात येवून मुलांना पुस्तकाचे महत्त्व पटवून देतात. पुस्तकं ही आपली खरी मित्र आहेत. त्यांच्या विना आपण कुठलीही भाषा बोलू शकत नाही, व्यवहार करू शकत नाही. पुस्तक वाचाल तर वाचाल, असा संदेश या नाटकाच्या माध्यमातून देण्यात आला आहे. जळगाव येथील जिवनविकास सामाजिक संस्थेच्या बालकलाकारांनी हे नाटक सादर केले.

गुंडाळलेले स्वप्न : सामाजिक जीवनात उद्भवलेल्या परिस्थितीमुळे लहान बालकांच्या मनावर परिणाम होवून ही मुले कशी चुकीच्या मार्गावर मार्गक्रमण करतात आणि या त्यांच्या चुकीच्या गोष्टीचे खापर परिस्थितीवर फोडतात. परिस्थितीच व्यक्तीला चुकीचं निर्णय घेण्यास भाग पाडते, हे सिद्ध करण्याचा प्रयत्न या नाटकातून झाला आहे. चुकीचा मार्ग निवडण्याआधी खूप वेळ विचार करून मगच ते कार्य करावे, असा संदेश यातून देण्यात आला आहे. भुसावळ येथील साने गुरुजी वाचनालयाने हे नाटक सादर केले.

सुपर पावर : सार्वे येथील स्वराज्य प्रतिष्ठानने सादर केलेले हे नाटक एका आळशी मुलावर आधारित आहे. त्या मुलाला अभ्यास न करता सुपरपॉवरची अपेक्षा असते. त्याला सुपरपॉवर मिळते सुद्धा. परंतु, ही सुपरपॉवर संपल्यानंतर त्याला त्या गोष्टीची जाणीव होते, की सुपरपॉवर वगैरे काही नाही. त्यानतंर तो अभ्यासाला लागतो आणि वर्गात पहिला येतो.

ढगाला लागली कड : लहान मुलांनी काही ऐकलं, पाहिलं तर त्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माणhttps://radarlive.in/ होवून त्याची उत्तरे शोधण्याचा ते प्रयत्न करतात. त्यांना योग्य उत्तर मिळाले तर ते संतुष्ट होतात. नाही तर वेगळ्या मार्गावर जावून आपल्या प्रश्नाची उत्तरे शोधतात.अशाच ढगाला लागली कड हे गाण ऐकून डोक्यात प्रश्न निर्माण झालेल्या रोहन नावाच्या एका लहान मुलाची ही कहाणी या नाटकातून मांडण्यात आली आहे. त्याला या प्रश्नाचे वेगवेगळ्या लोकांकडून वेगवेगळी उत्तर मिळतात. मात्र, आपले शिक्षकच असतात, तेच आपल्याला पडलेल्या प्रश्नाची योग्य उत्तरे देवू शकतात, असा संदेश या नाटकातून देण्यात आला आहे. जळगाव येथील यादव देवचंद पाटील विद्यालयाच्या बाल कलाकारांनी हे नाटक सादर केले.

रसिकांचा भरभरून प्रतिसाद

बालनाट्य स्पर्धेला दुसऱ्या दिवशी देखील रसिकांचा भरभरून प्रतिसाद लाभला. संपूर्ण सभागृह रसिकांनी भरले होते. बाल कलाकारांनी सादर केलेल्या नाटकाला टाळ्यांनी साद घालत उत्साह वाढविला.

बुधवारी या नाटकांचे सादरीकरण

बुधवारी (दि.१७) सकाळी १० वाजता आयडेंटिटी, ११.१५ वाजता क ला का ना का, दुपारी १२.३० वाजता अ ते ज्ञ, १.४५ वाजता जय हो फॅन्टसी, ३ वाजता मॅडम, ४.१५ वाजता झेप तर सायंकाळी ५.३० वाजता बदलू आम्ही गोष्टीला. या नाटकांचे सादरीकरण होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत