अशोक पाटील | शिरसोली : येथे प्रभु श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि शिरसोली ते शिर्डी पायवारीनिमित्त सोमवार (दि.२२) रोजी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी करण्यात आलेल्या ‘जय श्रीराम आणि साईबाबा की जय‘ च्या घोषणांनी शिरसोली परिसर दुमदुमला होता.
प्रभु श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त संपूर्ण शिरसोली गावात विद्युत रोषणाई करण्यात आली होती तसेच पहाटेच गावात रांगोळी काढून दिवे लावण्यात आले होते. यामुळे संपूर्ण शिरसोली गावात भक्तीमय वातावरण तयार झाले होते.
पालखी शिर्डीकडे रवाना
यावेळी गावातून पालखी मिरवणूक देखील काढण्यात आली. साईबाबा मंदिरापासून या मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. छत्रपती संभाजीराजे चौक, चारनळ चौक, वाणी गल्ली, चिंचपूरा चौक, अशोकनगर मार्गे परत साईबाबा मंदिरजवळ या मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. त्यानंतर वारी शिर्डीकडे रवाना झाली. अतिशय भक्तीमय वातावरणात ही मिरवणूक पार पडली.
बालकांनी वेधले लक्ष
मिरवणुकीत देण्यात आलेल्या साईबाबा की जय आणि जय श्रीराम या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. आकर्षक रथ आणि त्यामध्ये प्रभु श्रीराम, लक्ष्मण आणि सितामाता यांच्या वेशभूषेतील लहान बालकांनी सर्वांचे लक्ष वेधले.
एमआयडीसी पोलीस स्टेशनचे कर्मचारी अधिकार पाटील, समाधान पाटील, सिध्दोन ढवळे, शिरसोलीचे पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला.