Aamu Aakha Ek Se Farmer Producer Company

‘आमु आखा एक से’चा पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणार सन्मान

विशेष

नंदुरबार जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी : नितीन सावळे

नंदूरबार :- जिल्ह्यातील काकडदा येथील ‘आमु आखा एक से’ या शेतकरी उत्पादक कंपनीने केलेल्या उल्लेखनीय कार्याची दाखल घेऊन त्यांना १५ ऑगस्ट रोजी दिल्ली येथे आमंत्रित करण्यात आले असून या ठिकाणी त्यांचा पंत्रप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात येणार आहे. यामुळे नंदुरबार जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

अल्पभूधारक गरीब शेतकर्‍यांच्या उन्नतीसाठी केंद्र शासनाच्या कृषी मंत्रालयाने महत्वाकांक्षी सेन्ट्रल सेक्टर स्कीम अंतर्गत संपूर्ण भारतामध्ये एकूण दहा हजार शेतकरी उत्पादक कंपनी स्थापनेचे उद्दिष्ट निर्धारित केले आहे. यानुसार नंदुरबार जिल्ह्यात पाच शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना करण्यात आली आहे. या सर्व शेतकरी कंपन्या केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ घेऊन प्रगती साधत आहेत. दुर्गम भागात असलेल्या धडगाव तालुक्यातील काकडदा येथील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेत ‘आमु आखा एक से’ शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून प्रगतीकडे वाटचाल सुरु केली आहे. परिणामी या कंपनीचे संचालक लालसिंग वन्या वळवी यांचा भारताच्या स्वातंत्र्य दिनी दिल्ली येथे सन्मान होत आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागातील काकडदा येथे लालसिंग वन्या वळवी व आशा लालसिंग वळवी यांच्या नेतृत्वात या कंपनीतची दोन वर्षांपूर्वी स्थापना झाली. परिसरातील 17 गावातील सुमारे 579 शेतकरी यात सहभागी झाले आहेत. ज्यात 72  महिला शेतकरी आहेत. या कंपनीत सर्व शेतकरी आर्थिक दृष्ट्‍या दुर्बल घटकातील अल्पभूधारक आदिवसी शेतकरी आहेत. यातील सर्व शेतकरी डोंगर उतारावरील शेती पारंपारिक पद्धतीने करीत आलेले आहेत. मात्र आता केंद्र सरकारच्या गटाने शेती करण्याच्या योजनेतून आर्थिक लाभ व मार्गदर्शन घेऊन यातील शेतकरी गटाने शेती करु लागले आहेत. सोबतच तूर, भगर, तांदूळ या पिकांचे उत्पादन घेऊन या गटातील पुरुष व महिला शेतकरी एकत्रितपणे स्वतः धान्यांवर विविध प्रक्रींया आणि त्यांची व्यवस्थित पॅकींग करून सरळ ग्राहकांना त्याची विक्री करू लागले आहेत. व्यापाऱ्यांची मध्यस्थी नाहीशी झाल्याने त्यांन जास्त नफा मिळू लागला आहे.

आंबा, सीताफळची पॅकिंग

या भागात आंब्यांची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. आता शेतकरी सरळ आंबे न विकता शेतकरी स्वतः व महिला बचत गटाच्या महिलांसोबत त्याचे आमचुर बनवू लागले आहेत. तर आमचूरचे पावडरही बनवू लागले आहेत. या प्रक्रियेने त्यांना जास्त नफा मिळू लागला आहे. तर बचत गटाच्या महिलांनाही रोजगार मिळू लागला आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात होणार्‍या सीताफळची आता उघड्यावर विक्री न करता या त्याची बॉक्समध्ये व्यवस्थित पॅकिंग करून त्याची विक्री करू लागल्याने सीताफळची मागणी वाढून त्यांना चांगला पैसा पदरी पडू लागला आहे.

सातपुड्याच्या जंगलात बांबूची झाडे मुबलक आहेत. या कंपनीतील महिला व पुरुष बांबू पासून विविध संसारोपयोगी वस्तू बनवू लागले आहेत. त्यात रंगीत टोपल्या, खराटे आदींचा समावेश आहे. शेतकरी या गटाच्या माध्यमातून खत विक्री व धान्य खरेदीचाही व्यावासात करू लागले आहेत. यातूनही त्यांना चांगला पैसा मिळू लागला आहे. अशा एका आदिवासी कुटुंबातील शेतकऱ्यांचा स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दिल्लीतील लाल किल्ल्यावर यांच्या सत्कार होणार असून आदिवासी बांधवांसाठी ही अभिमानाची गोष्ट असून जिल्हाभरात त्यांचं कामाचं कौतुक करण्यात येत आहे.

3 thoughts on “‘आमु आखा एक से’चा पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणार सन्मान

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत