बालमृत्यू झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई

महाराष्ट्र प्रशासकीय

पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचा अधिकाऱ्यांना इशारा

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी : नितीन सावळे

नंदुरबार:- जिल्ह्यातील गरोदर माता आणि बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी कठोर पावले उचलली जात असून घरात बालमृत्यू झाल्यास त्या परिसरातील संबंधित यंत्रणेचे अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कारवाई करणार असल्याचा इशारा राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिला.

जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेची आढावा बैठक जिल्हा परिषदेमध्ये संपन्न झाली. याप्रसंगी ते बोलत होते. बैठकीला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी मंदार पत्की, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी रविंद्र सोनवणे,  ज्येष्ठ समाजसेवी डॉ. कांतीलाल टाटीया, लतिका राजपुत, चेतन साळवे, तालुका वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. 

पालकमंत्री गावित पुढे म्हणाले की, आरोग्य यंत्रणेतील कर्मचारी दुर्गम भागात नियमित जात नसल्याने कुपोषित बालक, गरोदर मातांना वेळेवर आरोग्य सुविधा मिळत नाहीत. ते  वेळेवर दवाखान्यात पोहचू शकत नाही. जर आरोग्य यंत्रणेचे अधिकारी कर्मचारी वेळेवर पोहचले तर कुपोषित बालके आणि गरोदर महिलांना चांगल्या सुविधा देण्याबरोबरच उपचारासाठी देखील तात्काळ रुग्णालयात दाखल करता येईल.

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील वाड्या-पाड्यापर्यंत आरोग्य सुविधा देण्यासाठी येत्या काही महिन्यात बारमाही रस्त्यांची बांधणी देखील केली जात आहे. तर दुर्गम अतिदुर्गम भागातील विद्युतीकरणाच प्रश्न मार्गी लावण्यासाठी देखील कसोशीने प्रयत्न केले जात आहेत. गरज भासल्यास गुजरात, मध्यप्रदेश सरकारच्या सामंजस्यआने अतिदुर्गम भागात विद्युत पुरवठा करुन हा प्रश्न देखील मार्गी लावण्यात येईल, असेही ते यावेळी म्हणाले.

दुर्गम भागातील आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण

वैद्यकीय महाविद्यालयास डॉक्टर्स आणि कर्मचारी वर्ग उपलब्ध झाल्यानंतर धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यात एक वार ठरवुन त्यांच्या मार्फतदेखील आरोग्य सुविधा पुरविण्यात येईल. राज्य तसेच जिल्हास्तरावर आरोग्य यंत्रणेला येणाऱ्या समस्यांचे निराकरण करुन दुर्गम भागातील आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण करण्याचा मानस पालकमंत्री गावित यांनी व्यक्त केला. 

सजग राहून समस्या मार्गी लावा

रस्त्यांची निर्मीती होईपर्यंत बांबुची झोळी करुन रुग्णांना दवाखान्यापर्यंत नेणाऱ्यांना काही अनुदान किंवा मानधन देता येईल का? तसेच तालुकास्तरावर शववाहीका उपलब्ध करून देण्याबाबत शासन स्तरावरुन तात्काळ निर्णय घेवून सर्व प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन देत आरोग्य यंत्रणेने सजग राहून जिल्ह्यातील आरोग्य समस्या मार्गी लावाव्यात, अशी सूचनाही पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी यावेळी दिल्या.

1 thought on “बालमृत्यू झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत