तब्बल ५ लाखांचा मुद्देमाल (Village liquor) जप्त ; ६ गुन्हे दाखल
जळगाव : तालुक्यातील देऊळवाडे येथे गावठी हातभट्टीची दारू (Village liquor) तयार करणाऱ्या भट्ट्यांवर गुरुवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई करण्यात आली. विविध ठिकाणी करण्यात आलेल्या कारवाईत तब्बल पाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून वेगवेगळे ६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मौजे देऊळवाडे (ता.जि.जळगाव) येथे तापी नदीच्या किनारी व आजूबाजूच्या परिसरात अवैध गावठी दारू (Village liquor) निर्मिती सुरू असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या निर्देशानुसार व राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक व्ही.टि. भुकन यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने देऊळवाडेसह परिसरात कारवाई केली.
20 हजार 200 लिटर रसायन जप्त
तापी नदीच्या किनारी व परिसरामध्ये छापेमारी करून दारू तयार करण्यासाठीचे 20 हजार 200 लिटर रसायन (कच्ची दारू), 222 लिटर गावठी दारू (Village liquor) असा 4 लाख 94 हजार 20 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. विभागीय भरारी पथक, निरीक्षक जळगाव, दुय्यम निरीक्षक, चोपडा यांच्या पथकाने संयुक्तरीत्या ही कारवाई केली.
६ गुन्हे दाखल
राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्य (Village liquor) निर्मिती व विक्रीवर कारवाईचे सत्र चालूच ठेवले असून एप्रिल २०२३ मध्ये २०२२ च्या तुलनेत कारवाईमध्ये मोठी वाढ झाल्याचा दावा करण्यात आला आहे. गुरुवार (दि.४) रोजी करण्यात आलेल्या कारवाईत वेगवेगळे ६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.