नंदुरबार पोलिसांकडून अधिक तपास सुरु
नंदुरबार :- दुचाकीने जावून एटीएममध्ये कॅश भरून येतो, असे सांगून 1 कोटी 5 लाख रुपयांची रक्कम लांबविणाऱ्या एटीएमच्या कॅश गाडीवरील कर्मचाऱ्यास नंदुरबार पोलिसांकडून नाशिक येथून अटक करण्यात आली आहे. राकेश चौधरी असे संशयिताचे नाव असून त्याच्याकडून काही रोकड देखील ताब्यात घेण्यात आली आहे. (Nandurbar Crime News)
नंदुरबार शहरातील विविध बँकांच्या एटीएममध्ये पैसे भरण्याचे काम रायटर कॉर्पोरेशन नामक कंपनीला देण्यात आले आहे. सोमवार दि.१४ रोजी नेहमीप्रमाणे या कंपनीचे पाच कर्मचारी चारचाकी वाहनासह कॅश कलेक्शन व भरणा करण्याच्या कामासाठी निघाले होते. यावेळी हे कर्मचारी धुळे चौफुलीवरील एका फायनान्स कंपनीतील कॅश घेण्यासाठी गाडी थांबले असताना एका कर्मचाऱ्याने मी दुचाकीवर जाऊन पोलीस मुख्यालयातील एटीएममध्ये कॅश भरुन येतो, असे सांगून १ कोटी ५ लाख रुपयांची रक्कम घेऊन पोबारा केला होता. याप्रकरणी नंदुरबार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नाशिक येथून संशयितास अटक
घटनेनंतर नंदुरबार पोलिसांनी तातडीने पथके नियुक्त करून संशयितांचा माग काढण्यासाठी रवाना केले होते. पथकानेही संशयिताचा कसून शोध घेत अवघ्या ४८ तासात त्याला अटक केली. तसेच त्याच्याकडून ५० लाख रुपयांची रोकड देखील जप्त करण्यात आली आहे. संशयितास नंदुरबार येथे आणल्यानंतर त्याची कसून चौकशी करण्यात येणार असून उर्वरित ५५ लाख रुपयांची रोकड गेली कुठे? यात आणखी कोणाचा हात आहे का? याचा छडा लावण्याचे आवाहन नंदुरबार पोलिसांसमोर असणार आहे.