Chlisgaon Crime News : चुलत दिराच्या मदतीने पत्नीनेच केला पतीचा खून

गुन्हे

चाळीसगाव । शहर प्रतिनिधी

प्रेम संबंधात अडथळा ठरत असल्याने चुलत दिराच्या मतदीने पत्नीनेच पतीचा खून केल्याची खळबळजनक घटना चाळीसगाव तालुक्यातील कोदगाव येथे उघडकीस आली आहे. बाळू सिताराम पवार (रा. गवळीवाडा, न्यायडोंगरी, ता. नांदगाव, जि. नाशिक) असे मयत इसमाचे नाव असून याप्रकरणी महिला व तिच्या चुलत दिराला अटक करण्यात आली आहे.

बाळू सीताराम पवार हा पत्नी वंदना पवार (वय – ३०) हिच्यासह न्यायडोंगरी (ता. नांदगाव, जि. नाशिक) येथे वास्तव्यास होता. बाळू याला दारूचे व्यसन असल्याने तो पत्नी वंदना हिला दररोज मारहाण करीत होता. या दरम्यान, वंदना हिचे तिचा चुलत दीर गजानन राजेंद्र पवार (वय – ३२, रा. न्यायडोंगरी, ता. नांदगाव, जि. नाशिक) याच्याशी प्रेम संबंध जुळले. या प्रेम संबंधात पती अडथळा ठरत असल्याने त्यांनी बाळू याला संपविण्याचा निर्णय घेतला.

अपघात दाखविण्याचा प्रयत्न…
वंदना आणि तिचा चुलत दीर गजानन याने मंगळवार, दि. १८ रोजी बाळू यास खूप दारू पाजून त्यानंतर त्याला दुचाकीवर बसवून रात्री १०.३० वाजेच्या सुमारास न्यायडोंगरीवरून चाळीसगाव तालुक्यातील कोदगाव येथे आणले. या ठिकाणी वंदना हिने बाळू याच्या पोटावर ब्लेडने वार करून जखमी केले. त्यानंतर दोन वेळ डोक्यात दगड मारून ठार केले. त्यानंतर हा अपघात वाटावा म्हणून त्याचा मृतदेह महामार्गावर आणून टाकला व बाळू याच्या खिशात आधारकार्ड ठेवून दोघे तेथून पसार झाले.

मोबाईल लोकेशनने फुटले बिंग
दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. घटनास्थळी रक्ताने माखलेले दगड आणि बाळू याच्या शरीरावरील ब्लेड आणि दगडाने मारल्याच्या खुणा आढळून आल्याने हा अपघात नसून खून असल्याचे पोलिसांना दिसून आले. यावेळी मृतदेहाची झाडाझडती घेतांना पोलिसांना वंदना हिचा मोबाईल नंबर आढळून आला. पोलिसांनी त्या नंबरवर संपर्क साधून कुठे आहेत, अशी विचारणा केली. यावेळी महिलेने मी, शिर्डी येथे असून पती न्यायडोंगरी येथे गेल्याची माहिती दिली. मात्र, महिलेच्या उडवाउडवीच्या उत्तराने पोलिसांना संशय येऊन त्यांनी त्या मोबाईल नंबरचे लोकेशन तपासले. या नंबरचे लोकेशन चाळीसगाव रेल्वे स्टेशन दाखवीत असल्याने, पोलिसांनी तातडीने तिकडे धाव घेत दोघांना अटक केली. पोलिसांनी खाक्या दाखविताच त्यांनी खुनाची कबुली दिली.

याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर ढिकले यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत