रडार लाईव्ह न्यूज । धरणगाव तालुका प्रतिनिधी
धरणगाव तालुक्यातील आनोरे, धानोरे, गारखेडे शिवारात सोमवार, दि 17 रोजी वरूणराजाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे बळीराजाला बऱ्यापैकी दिलासा मिळाला. (strong rain presence in Anore Shivar)
गेल्या दोन दिवसांपासून सुर्य आग ओकू लागल्याने तापमान देखील वाढले होते. त्यामुळे पूर्वहंगामी कपाशी देखील कोमेजू लागली होती. बहुतेक शेतकऱ्यांचा पाण्याचे टँकर विहिरीत टाकून कपाशी वाचविण्याचा प्रयत्न चालू होता. परंतु, सोमवार, दि 17 रोजी सायंकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला. आनोरे, धानोरे, गारखेडे शिवारात जवळपास 20 मिनिटे मृगसरी बरसल्या. त्यामुळे पूर्वहंगामी कपाशीला जीवदान मिळाले. जमिनीत ओल गेल्याने कोरडवाहू जमीन असलेले शेतकरी देखील कपाशी लागवड करतील, असे चित्र दिसत आहे. यावर्षी शिवारात कपाशीचा पेरा मोठ्या प्रमाणात होईल, असा अंदाज व्यक्त होत आहे. गेल्यावर्षी दुष्काळ असल्याने हे साल मात्र चांगले येईल, अशी आशा बळीराजाला लागून आहे.