रडार लाईव्ह न्युज । धरणगाव तालुका प्रतिनिधी
धरणगाव तालुक्यात रिमझिम पाऊस वगळता अद्याप एकदाही ओढे-नाले वाहून निघाले नाहीत. दरम्यान, शेतकऱ्यांनी पेरणी व कपाशी लागवड केली असून पावसाचा खंड पडल्याने शेतकऱ्यांचे डोळे सध्या आभाळाकडे लागलेले आहेत.
धरणगाव तालुक्यातील आनोरे, धानोरे, गारखेडे, गंगापुरी, पष्टाने शिवारात अद्यापही जोरदार पाऊस झालेला नाही. फक्त एकदाच पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी ज्वारी व कपाशी लागवड केली होती. यानंतर मात्र पावसाचा खंड पडल्यामुळे कपाशीची फुग निघू लागली आहे. तर ज्वारीचे देखील कोंब जळू लागलेले आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय नाही अशा शेतकऱ्यांना मात्र आता चिंता भेडसावू लागली आहे.
धरणगाव तालुक्यातील विहिरींनी तळ गाठल्याने आता फक्त पावसाची आशा बळीराजाला आहे. दुपारी कडक ऊन पडू लागल्याने दुष्काळात तेरावा महिना, असल्याचा अनुभव शेतकऱ्यांना येत आहे. तसेच बांधावर गवत वाढू न लागल्याने पशुपालकांना चाराची चिंता लागली आहे. उन्हाळ्यात साठवलेली कडबा कुट्टी, मकाचा चारा संपू लागल्याने आता गुरांना चारा कोठून आणावा, असा यक्षप्रश्न पशुपालकांना पडू लागला आहे.