जो संघर्ष करतो तोच उद्योग करू शकतो!

शैक्षणिक

स्पेक्ट्रम इंडस्ट्रीजचे संचालक दीपक चौधरी यांचे प्रतिपादन

जळगाव :- जो संघर्ष करतो तोच बिझनेस करू शकतो. उद्योग सुरु करत असतांना त्यामध्ये असंख्य अडचणी येतात प्रारंभी सुरु करतांना त्यानंतर तो सुरळीत सुरु रहावा यासाठी आणि तिसऱ्या टप्प्यात व्यवसाय शाश्वत सुरु रहावा यासाठी संघर्ष करावा लागतो, असे प्रतिपादन स्पेक्ट्रम इंडस्ट्रीजचे संचालक दीपक चौधरी यांनी केले.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात इनोव्हेशन, इन्क्युबेशन अॅण्ड लिंकेजस केंद्राच्यावतीने नवउद्योजकांसाठी तीन दिवसीय निवासी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी हे होते.

श्री. चौधरी पुढे बोलतांना म्हणाले की, व्यावसायाचा विचार करतांना अडचणी व संघर्ष अटळ आहे मात्र यातून मार्ग काढत यश प्राप्त केल्यानंतर गुंतवणूकदारांचा विश्वास वाढतो. प्रत्येक व्यवसायाचा समाज आणि पर्यायाने देशाला फायदा होत असतो. शिक्षण आणि व्यवसाय यांचा थेट संबध नाही. मात्र व्यवसायाला शिक्षणामुळे पाठबळ मिळते. आपण प्राप्त केलेल्या शिक्षणाला अनुसरूनच व्यवसाय करायला हवा असे नव्हे तर त्या पलिकडेही अनेक पर्याय आहेत. त्याकडेही जाता आले पाहिजे. व्यवसाय शाश्वत रहावा यासाठी सर्व नियमांची अंमलबजावणी करा. केवळ पॅशन म्हणून व्यवसाय सुरु न करता नेमके काय करायचे याचे धोरण आखा असेही ते म्हणाले.

अध्यक्षीय भाषणात कुलगुरू प्रा. माहेश्वरी यांनी व्यवसायात मानसिक, शारिरीक, भावनिक आणि अध्यात्मिक या गुणांची गरज असल्याचे सोदाहरण स्पष्ट केले. बांधिलकी, आत्मविश्वास, वचनबध्दता, नैतिकता या गोष्टी देखील व्यवसाय यशस्वी होण्यासाठी आवश्यक असल्याचे प्रा. माहेश्वरी यांनी सांगितले.

संचालक डॉ. राजेश जवळेकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. विकास गीते यांनी केंद्राची वाटचाल सांगितली. डॉ. भूषण चौधरी त्यांनी तीन दिवसाच्या कार्यशाळेची रूपरेषा सांगितली. कार्यशाळेत २० उद्योजक सहभागी झाले असून ज्यांनी आपल्या उद्योगांची नोंदणी केलेल्या असून छोट्या प्रमाणात हे व्यवसाय सुरु आहेत. या व्यवसायाला अधिक गती प्राप्त व्हावी व गुंतवणूक वाढावी यासाठीचे प्रशिक्षण त्यांना या कार्यशाळेत दिले जाणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत