बापरे… प्राथमिक आरोग्य केंद्रातील खोकल्याच्या औषधात (Cough Syrup) आढळल्या अळ्या

हॅपनिंग महाराष्ट्र

औषध साठा (Cough Syrup) सील करण्यात यावा; आमदार पाडवी यांची मागणी

नंदुरबार : जिल्ह्यातील खापर प्राथमिक आरोग्य केंद्रात लहान मुलांना देण्यात येणाऱ्या खोकल्याच्या औषधात (Cough Syrup) अळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान, या प्रकारानंतर हा औषधसाठा सील करून संबंधित कर्मचारी आणि पुरवठादारावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आमदार पाडवी केली आहे.

वातावरणातील बदलामुळे सर्दी-खोकल्याच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यामुळे खाजगीसह सरकारी दवाखान्यांमध्ये गर्दी होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. मात्र, ज्या सरकारी दवाखान्यांवर नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी आहे, नेमक्या त्याच दवाखान्यांमध्ये नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे पहावयास मिळत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील खापर प्राथमिक आरोग्य केंद्रात ६ जानेवारी रोजी उपचारासाठी आलेल्या एका बालकाला खोकल्याचे औषध (Cough Syrup) देण्यात आले होते. मात्र, या औषधात अळ्या आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

सरकार जिवाशी खेळत असल्याचा आरोप

औषधामध्ये (Cough Syrup) अळ्या आढळून आल्यानंतर संबंधित कुटुंबाने ठाकरे गटाचे आमदार पाडवी यांच्याकडे धाव घेत तक्रार केली. त्यानंतर आ. पाडवी यांनी खापर प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. त्याठिकाणी हे औषध लहान मुलांना दिलं जात असल्याचं निदर्शनास आल्यावर त्यांनी सरकार आदिवासी बालकांच्या जिवाशी खेळत असल्याचा आरोप केला आहे.

आरोग्य मंत्र्यांकडे तक्रार

आ. पाडवी यांनी या संदर्भात आरोग्य मंत्र्यांकडे तक्रार केल्यानंतर आरोग्य उपसंचालक तपासणीसाठी आले. सातपुड्याच्या दुर्गम रागांमध्ये मुदत संपलेल्या औषधी प्राथमिक केंद्रात सर्रास दिल्या जातात, त्यातलाच हा एक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यात हा औषध साठा गेला असेल तर तो सील करण्यात यावा व संबंधित कर्मचारी आणि पुरवठादारावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आ. पाडवी यांनी केली आहे. शासनाने या गोष्टीची गंभीर दखल घेतली नाही तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत