Dr. Ravindra Shobhane

Marathi Sahitya Sammelan 2024 : मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी आग्रही : प्रा.डॉ. रवींद्र शोभणे

महाराष्ट्र सांस्कृतीक

पूज्य साने गुरुजी साहित्य नगरी, (अमळनेर, जि.जळगाव) : मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी आग्रही आहे. एकीकडे मराठी भाषेच्या अभिजात दर्जासाठी आपण आग्रही असताना मराठी भाषेच्या, मराठी माध्यमांच्या शाळांची अवस्था काय आहे? असा प्रश्न 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे (Akhil Bhartiya Marathi Sahitya Sammelan) अध्यक्ष तथा प्रसिद्ध साहित्यिक प्रा.डॉ. रवींद्र शोभणे यांनी उपस्थित केला.

अमळनेर येथील अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे मराठी वाड्मय मंडळद्वारा आयोजित 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे (Akhil Bhartiya Marathi Sahitya Sammelan) उद्घाटन शुक्रवार (दि.2) रोजी पार पडले. याप्रसंगी ते बोलत होते. प्रा.डॉ. रवींद्र शोभणे पुढे म्हणाले, साहित्याने काळासोबत चालावे, असे म्हटले जाते. अर्थात यात दोन प्रकार संभवतात. पहिला म्हणजे अगदी समकालिन, वर्तमानकालिन, वर्तमानकालिन समाजवास्तव रेखाटणारे साहित्य आणि दुसरा प्रकार म्हणजे बदलत्या काळाचा, वर्तमानाचा विचार न करता, मानवी नात्यातील सनातन मूल्ये आपल्या प्रकृतीने मांडणारे लेखन. अर्थात समकालाचे, वर्तमानाचे साहित्यात चित्रण करताना मानवी नात्यातील सनातन मूल्ये येत नाहीत, असे कुणीही समजू नये. पण काही लेखक समाजातील बदलांकडे पूर्णत: पाठ फिरवून लेखन करतात. अर्थात अशा प्रकारचे लेखन कमअस्सल असते, असेही मानता येणार नाही. मराठी साहित्यात नव्या, ताज्या विषयांना मराठी नाटकांनी अधिक प्राधान्याने रसिकांसमोर आणले. यात अनिल बर्वे हा नाटककार, कादंबरीकार अग्रेसर होता.

साठोत्तरी प्रवाह : नव्या वाटा
मराठीत साठोत्तरी काळात दलित साहित्याचा मोठा प्रवाह वेगाने आला आणि संपूर्ण जाणकार वाचकांचे, रसिकांचे लक्ष त्याकडे वेधले गेले. युगानुयुगांपासूनची ठसठसती वेदना, दु:ख त्या साहित्यातून व्यक्त होऊ लागले. त्यात व्यक्त होणाऱ्या विद्रोहाने इथल्या पारंपरिक मूल्यांना जबरदस्त हादरे देत हे साहित्य एका दशकाच्या आतच प्रस्थापित झाले. या साहित्याचा अमोघ वेग आणि जीवनानुभव पाहता श्रेष्ठ, भारतीय पातळीवरची महाकादंबरी दलित साहित्यातूनच जन्माला येईल, असा विश्वास अनेक जाणकारांनी व्यक्त केला होता. पण जवळजवळ 50 वर्षे उलटूनही या अपेक्षा मात्र त्या साहित्याने पूर्ण केल्या नाहीत, असे तटस्थपणे विचार करता म्हणावे लागते. काही लक्षवेधी कादंबऱ्या नक्कीच या साहित्याने दिल्या. त्या सगळ्यांचा आदराचा विषयही ठरला.

भाषिक अभिमानापेक्षा पोटाचे प्रश्न महत्त्वाचे
जागतिकीकरणाने मराठी भाषासुद्धा शिल्लक राहील की नाही, अशी भीती वर्तविली जाते. या जागतिकीकरणाने जगाच्या पाठीवरील किती बोली संपल्या आणि किती बोली संपायच्या मार्गावर आहेत, याची मोजदाद भालचंद्र नेमाडे (Bhalchandra Nemade) यांनी आपल्या देशीवादाच्या निबंधात केली आहे. व्यवहाराची भाषा अणि बोलण्याची वेगळी बोली अशी आपल्या बहुतेक समाजाची स्थिती आहे. व्यवहाराच्या भाषेसोबतच उपजीविकेची भाषा अशीही वर्गवारी करावी लागेल. जागतिक बाजारपेठेत तुम्हाला ती भाषा वापरल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. कारण भाषिक अभिमानापेक्षा पोटाचे प्रश्न अधिक प्रमाणात महत्त्वाचे असतात. जागतिकीकरण आल्यामुळे खरंच आपल्या भाषा संपणार आहेत का? यावर विचार होणे गरजचे आहे.

काही अपवाद सोडला तर बहुतेक मराठी वृत्तपत्रांच्या रविवार पुरवण्या बंद पडलेल्या आहेत. काही आहेत तर त्यात कथा, कविता छापणे बंद झाले आहे. आता कथा-कविता कोण वाचतं? म्हणून वृत्तपत्रांचे मालक प्रश्न विचारतात. बालविभाग बहुतेक बंद झाले आहेत. शाळा-महाविद्यालयात एकांकिका, नाटकांचे प्रयोग बंद झाले आहेत. तेथे पाश्चात्य धर्तीवरील कार्यक्रमांची रेलचेल असते. ग्रंथालयांची स्थिती आणखीच वाईट आहे. याचा संमिश्र परिणाम म्हणून आज मराठी भाषेची, संस्कृतीची पिछेहाट होताना आपल्याला पाहायला मिळते, असेही प्रा.डॉ.रवींद्र शोभणे यांनी स्पष्ट केले.

1 thought on “Marathi Sahitya Sammelan 2024 : मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी आग्रही : प्रा.डॉ. रवींद्र शोभणे

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत