1 No. Cha Dha

‘१ नंबरचा ढ’ चित्रपट जल्लोषात प्रदर्शित

सिनेमा महाराष्ट्र

चित्रपटाचे लेखक, गीतकार, दिग्दर्शक प्रशांत सोनवणे यांची पत्रकार परिषदेत माहिती

जळगाव : अभ्यासात मागे पडलेल्या आणि वाचता, लिहिता किंवा काही जमले नाही म्हणून ‘ढ’ म्हणून हिणवल्या जाणाऱ्या मनीष नावाच्या एका मुलावर आधारित ‘१ नंबरचा ढ’ सिनेमा शुक्रवारी (दि.२) जल्लोषात प्रदर्शित झाल्याची माहिती सिनेमाचे लेखक, गीतकार तथा दिग्दर्शक प्रशांत सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. शहरातील अशोक टॉकीज येथे या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. (The movie ‘1 No. Cha Dha’ was released with great fanfare)

पत्रकार परिषदेच्या सुरुवातील जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे यांच्याहस्ते सिनेमाच्या पोस्टरला माल्यार्पण करून व नारळ ओवाळण्यात आले. त्यानंतर सिनेमागृहात सिनेमा प्रदर्शित करण्यात आला. याप्रसंगी सिनेमाचे लेखक, गीतकार तथा दिग्दर्शक प्रशांत सोनवणे, भाजपच्या चित्रपट आघाडीचे जिल्हाध्यक्ष रोहित चौधरी, सांस्कृतिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष पवन खंबायत, सुरेश राजपूत, प्रशांत जाधव यांसह मान्यवर उपस्थित होते. किंग प्रॉडक्शन आणि नर्मदास फ्युचर फिल्म्सतर्फे या चित्रपटाची निर्मिती करण्यात आल्याचेही श्री. सोनवणे यांनी यावेळी सांगितले.

जळगाव जिल्ह्यातच शुटिंग
‘१ नंबरचा ढ’ या चित्रपटाची शूटिंग जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील खिर्डी, पाल, सावदा, फैजपूर आदी भागात करण्यात आली आहे. कमलेश सावंत, प्राची नील, लीना भुतकर, शर्व कुलकर्णी या  कलाकारांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. मनीष याची भूमिका शर्व कुलकर्णी, महादेव अर्थात मनीषच्या वडिलांची भूमिका कमलेश सावंत, सुरेखा अर्थात आईची भूमिका प्राची नील यांनी तर अजीची भूमिका विना भूतकर यांनी साकारली आहे. चित्रपटात स्थानिक कलाकारांना देखील संधी देण्यात आली असून यात किरण अडकमोल, हर्षल पाटील, विशाल जाधव, जगदीश नेवे, मोरेश्वर सोनार, आरती गोळीवाले, सपना बाविस्कर, नुपूर पांडे, अनिल कोष्टी तर बाल कलाकारांमध्ये दिग्विजय जगदाळ, पराग चौधरी, सिद्धार्थ पाटील, उत्कर्ष नेमाडे, कृष्णा चौधरी, अभिजित पाटील, आरुष रायसिंग आदींचा समावेश असल्याचे दिग्दर्शक प्रशांत सोनवणे यांनी सांगितले.

प्रत्येकाने हा चित्रपट पाहावा : आ. राजूमामा भोळे
निर्मात्यांनी चित्रपट बनवितांना आपल भुमिशी जे नातं जोडून ठेवलं, चित्रपटाची सुरुवात जळगावपासून केली, याचा जळगावकर म्हणून आनंद वाटत आहे. ‘१ नंबरचा ढ’ हा शब्द जो वापरला जातो. या ‘ढ’ शब्दापासून काहीतरी चांगला बोध समाजाला देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. कोणाला कमी न लेखता प्रत्येकामध्ये काही तरी गुण असतात आणि हेच गुण त्यांनी चित्रपटात दाखविण्याचा प्रयत्न केला असेल, असे सांगून व निर्माते, कलाकार आदींचे अभिनंदन करून प्रत्येकाने हा चित्रपट पाहावा, असे आवाहन आमदार राजूमामा भोळे यांनी केले.

शालेय जीवनावर आधारीत चित्रपट : प्रशांत सोनवणे
 ‘१ नंबरचा ढ’ हा चित्रपट आज रिलीज होत आहे. हा सिनेमा शालेय जीवनावर आधारीत असून शाळा ही काहींना आवडते तर काहींना आवडत नाही. यातील शाळा न आवडणाऱ्या मुलाची ही गोष्ट आहे. त्याला शाळा आवडत नाही म्हणून त्याला घरचे प्रेशराइज्ड करतात. तेव्हा तो शाळा सोडून पळून जातो. त्यानंतर काय घडत, तो कशा पद्धतीने घरी येतो, याचे चित्रीकरण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न या चित्रपटातून केला आहे.

1 thought on “‘१ नंबरचा ढ’ चित्रपट जल्लोषात प्रदर्शित

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत