गिरणा नदीपात्रासह बांभोरी गावात महसूल आणि पोलीस प्रशासनाची संयुक्त कारवाई
जळगाव :- जिल्ह्यात हैदोस घातलेल्या वाळू माफियांना शनिवार दि.१९ रोजी जिल्हा प्रशासनाने चांगलाच दणका दिला. महसूलच्या विभागीय पथकासह जळगाव महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाने गिरणा नदी पात्रासह बांभोरी गावात कारवाई करत १०० पेक्षा जास्त ट्रॅक्टर व डंपर जप्त केल्याचे समजते.
जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून अवैधरित्या वाळू वाहतूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. प्रशासनाकडून कोणतीही कडक कारवाई केली जात नसल्याने तसेच कारवाई झालीच तर थातुर मातुर कारवाई होत असल्याने वाळू वाहतूकदारांची हिम्मत वाढल्याचे दिसून आले होते. दरम्यान, जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद यांनी पदभार स्विकारल्यानंतर अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. तसेच त्या दिशेने पाऊले उचलायला देखील सुरुवात केली.
महसूल विभागाच्या विभागीय पथकासह जळगाव महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाने शनिवार दि.१९ रोजी पहाटे ६ वाजेच्या सुमारास नदी पात्रात उतरून कारवाई केली. त्यानंतर पथकाने बांभोरी गावात जाऊन त्याठिकाणी असलेल्या ट्रॅक्टर आणि डंपरवर देखील कारवाई केली. अचानक झालेल्या या कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले असून बांभोरी गावासह परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, यासंदर्भात प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.