शुभम जाधव | जळगाव जिल्हा प्रतिनिधी
एरंडोल : कलकत्ताकडून सुरतकडे जाणाऱ्या धावत्या कंटेनरचा पाटा तुटून पलटी झाल्याची घटना एरंडोल शहरालगत असलेल्या उड्डाणपुलाजवळ घडली. सुदैवाने या घटनेत चालक आणि क्लिनर यांना कोणतीही दुखापत झाली नाही.
कंटेनर चालक अजय कुमार शाह (वय-41) हे शनिवार, दि. 15 रोजी ताब्यातील कंटेनर (NL.01. L.6121) घेवून सुरत येथील एका कंपनीत जात होते. यावेळी एरंडोल शहराजवळील अंजनी नदीजवळ असलेल्या उड्डाण पुलावर कंटेनर चढवत असताना अचानक कंटेनरचा पाटा तुटल्याने हा कंटेनर महामार्गावर कोसळल्याची घटना शनिवार, दि. 15 रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास घडली.
जीवितहानी टळली
श्री. शाह व क्लिनर (नाव माहीत नाही) हे सुरत येथील एका कंपनीत पावडर घेवून जात होते. यावेळी उड्डाण पुल चढत असताना अचानक पाटा तुटल्याने कंटेनर जागीच पलटला. सुदैवाने यावेळी महामार्गावरून कोणतेही वाहन जात नसल्याने मोठी घटना टळली. चालक आणि क्लिनर यांना देखील कोणतीही दुखापत झाली नाही.