मुंबई : सशस्त्र सीमा बल विभागाच्या पोलीस महानिदेशक तथा वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश राज्याच्या गृह विभागाकडून जारी करण्यात आले असून त्या लवकरच राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा पदभार स्वीकारणार आहेत.
आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला या १९८८ च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी असून राजकीय नेत्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणानंतर रश्मी शुक्ला यांचं नाव चर्चेत आलं होतं. त्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या मानल्या जातात. दरम्यान, तत्कालीन पोलीस महासंचालक रजनीश सेठ हे ३१ डिसेंबरला निवृत्त झाल्याने त्यांच्या रिक्त झालेल्या जागी आयपीएस रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या रूपाने राज्याला पहिल्या महिला पोलीस महासंचालक मिळाल्या आहेत.
राज्यातील सर्वात वरिष्ठ आयपीएस अधिकारी असल्याने संघ लोकसेवा आयोगाच्या Empanelment Commitee शिफारस केलेल्या अधिकाऱ्यांच्या यादीत शुक्ला यांच्या नावाचा समावेश होता. तसेच पोलीस महासंचालक पदासाठीच्या ज्येष्ठता यादीत त्यांचे नाव आघाडीवर होते. रश्मी शुक्ला यांना मुंबईचे पोलीस आयुक्त करण्यात येणार असल्याची चर्चा होती. शेवटी त्यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे