आयुष मंत्रालयात वैज्ञानिक शास्रज्ञ म्हणून नियुक्ती; एरंडोलसह जळगावच्या शिरपेचात रोवला मनाचा तुरा
मुस्तकीम बागवान । रवंजे बु. वार्ताहर
घरात अठरा विश्वे दारिद्रय, दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असतांना उच्च शिक्षण घेऊन नोकरीची अपेक्षा देखील कोणी करणार नाही. त्यातही क्लास १ ऑफिसर पदाची. मात्र, अशा साऱ्या परिस्थितीवर मात करत एरंडोल येथील एका हमालाच्या मुलाने फक्त उच्च शिक्षणच घेतले नाही तर भारत सरकारच्या आयुष मंत्रालयात रिसर्च ऑफिसर क्लास – १ वैज्ञानिक शास्त्रज्ञ या पदावर नोकरी मिळवली. आणि वडिलांच्या कष्टाचे चीज केले. त्याच्या या यशाने त्याचे सर्वत्र कौतुक होत असून एरंडोलसह जळगाव जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
एरंडोल येथील सय्यद वाडा परिसरातील रहिवासी मुनाफ खान हे हमाली काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. ते करीत असलेल्या कामात कमाई तोडकी असल्याने कुटुंबाचा रहाटगाडा जेमतेम ओढला जात होता. मात्र, आपल्या वाटाल्या आलेले कष्ट आणि दारिद्र आपल्या मुलांच्या वाटे येऊ नये म्हणून त्यांनी त्यांना शिक्षण देण्याचा आणि मुलाला डॉक्टर बनविण्याचा निर्णय घेतला. जिद्द, चिकाटी, मुलाला डॉक्टर बनविण्याचे स्वप्न उराशी बाळगून, रक्ताचे पाणी करून मुलांना शिकविले.
मुलाने केले कष्टाचे चीज
मुलगा डॉ. मुस्तकीम पठाण यांनीही वडील करीत असलेले कष्ट आणि आपल्यासाठी घेतलेले परिश्रम याची जाणीव ठेवत एम.डी. पर्यंतचे उच्च शिक्षण घेतले आणि एवढ्यावर न थांबता भारत सरकारच्या आयुष मंत्रालयातर्फे घेण्यात आलेली रिसर्च ऑफिसर क्लास १ वैज्ञानिक शास्त्रज्ञ या पदाची परीक्षा दिली. आणि त्यात यशही मिळविले. मात्र, आज त्यांचे हे यश पाहण्यासाठी त्यांचे वडील मुनाफ खान हे हयात नाहीत. डाॅ. मुस्तकीम पठाण यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
वडील नक्कीच खुश झाले असतील
भारत सरकारच्या आयुष मंत्रालयातर्फे रिसर्च ऑफिसर क्लास १ वैज्ञानिक शास्रज्ञ म्हणून रूजू झालो हे पाहण्यासाठी आज माझे वडील या जगात नाहीत. परंतु, माझे हे यश पाहून ते नक्कीच आनंदी झाले असतील, अशी प्रतिक्रिया डॉ. मुस्तकीम पठाण यांनी ‘रडार लाईव्ह’शी बोलतांना दिली.