औरंगाबाद येथील लाचलुचपत विभागाची कारवाई
औरंगाबाद : दाखल गुन्हयात अटक न करण्यासाठी व वाढीव कलम न लावण्यासाठी ५ हजाराची लाच (Corruption) घेणाऱ्या देवगाव (रंगारी) पोलीस स्टेशनच्या पोलीस हेड कॉन्स्टेबलला औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून ताब्यात (Arrest) घेण्यात आले आहे.
तक्रारदार यांचे त्यांच्या मोठ्या भावाशी व भावजायीशी घरगुती वाद असून याप्रकरणी कन्नड तालुक्यातील देवगाव (रंगारी) पोलीस स्थानकात तक्रारदार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गुन्ह्यात तक्रारदार यांना अटक न करण्यासाठी व वाढीव कलम न लावण्यासाठी पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरेश शिंदे (वय-38), यांनी दि.२८ जुलै रोजी तक्रारदार यांच्याकडे २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती ५ हजार रुपये देण्याचे ठरल्यानंतर तक्रारदार यांनी औरंगाबाद येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेत तक्रार दाखल केली.
या पथकाने केली कारवाई
तक्रारदार यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार सोमवारी (दि.३१) पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे, हनुमंत वारे, पोलीस नाईक दिगंबर पाठक, केवलसिंग घुसिंगे, चांगदेव बागुल आदींच्या पथकाने सापळा रचून सुरेश शिंदे यांना लाच घेतांना रंगेहात अटक केली. याप्रकरणी देवगाव (रंगारी) पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असून पुढील कारवाई करण्यात येत आहे. भ्रष्टाचारासंबंधी काही तक्रार असल्यास टोल फ्री क्र 1064 किंवा पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, औरंगाबाद 9923023361 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे, पोलीस उपअधीक्षक राजीव तळेकर यांनी केले आहे.
1 thought on “पोलीस हेड कॉन्स्टेबलला पाच हजाराची लाच घेतांना अटक”