महाविकास आघाडीचे उमेदवार करणदादा पाटील यांचे मतदारांना आवाहन; जळगावात पार पडली कॉर्नर सभा
जळगाव : भाजपाने २०१४ ची निवडणूक १५ लाख रुपये आणि भ्रष्टाचार या मुद्यांवर चालविली. त्यानंतर २०१९ ला पुलवामा आणि आता देश-विदेशाच्या मुद्यावर चालविली जात आहे. परंतु, मला देश-विदेशाच्या मुद्द्यांवर हायफाय भाषणं करून गल्लीचे प्रश्न संपवायचे नाहीत. जळगाव लोकसभा मतदार संघात तुम्हीच भाजपाला एक-दोन नव्हे तर ३०-४० वर्षे संधी दिली. आता एक वेळ आम्हालाही संधी द्या, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला संधी द्या, असे आवाहन महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार करणदादा पाटील यांनी केले.
जळगाव शहरातील उस्मानिया पार्क येथे महाविकास आघाडीच्यावतीने कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी ते बोलत होते, यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष एजाज मलिक, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुफ्ती हारून नदवी, माजी महापौर जयश्री महाजन, माजी उपमहापौर कुलभूषण पाटील, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, उपमहानगर प्रमुख प्रशांत सुरळकर, गणेश गायकवाड, सलीम इनामदार, महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, डेबुजी फोर्सचे अध्यक्ष सागर सपके, शिवसेनेचे विभाग प्रमुख अण्णा भोईटे, माजी नगरसेवक इब्राहिम पटेल, शकील बागवान, राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष गौरव वाणी, आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष अमृता नेरकर,माजी नगरसेवक सुनील माळी यांसह पदाधिकारी उपस्थित होते.
करणदादा पाटील पुढे बोलतांना म्हणाले की, मशाल ही अंधाराकडून उजेडाकडे नेणारी आहे, मशाल ही माजलेल्या रावणाची लंका जाळणारी आहे, मशाल ही अन्यायाविरुद्ध लढणारी आहे. शिवसेनेला एकदा संधी देऊन पहा, आम्ही कुणाचीच मोगलाई, कुणाचीच मस्ती, कोणाचाच माज या ठिकाणी चालू देणार नाही. तुम्ही आज जशी साथ दिली, तशी साथ मी कायमस्वरूपी देईल, असे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले.
देशाला वाचविण्यासाठी मतदान करायचंय : मुफ्ती हारून नदवी
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुफ्ती हारून नदवी सभेत बोलताना म्हणाले की, नरेंद्र मोदी आणि त्याच्या परिवाराने खोटी गॅरंटी देऊन देशाला बरबाद केले आहे. या देशाला द्वेषापासून वाचविण्यासाठी महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सला भक्कम करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. आपल्याला शिक्षण, बेरोजगारी संपविण्यासाठी, द्वेष मिटविण्यासाठी, देश वाचविण्यासाठी आणि देशाच्या विकासासाठी मतदान करायचे आहे. आणि हे मतदान ‘मशाल’ला करायचे आहे. मशाल समोरील बटन दाबून करणदादा पाटील यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
आता आपण जागं झालं पाहिजे : संजयजी सावंत
यांना आपण कसही फसवू शकतो, यांच्याकडून कसेही मतं मागू शकतो आणि ते आपल्याला मत देतील, असे भाजपने आपल्याला गृहीत धरले आहे. माझी आपल्याला विनंती आहे की, आपण आता जागं झालं पाहिजे, आपल्या मताचा अधिकार काय? हे आपण समजून घेतलं पाहिजे, आपलं एकमत त्यांच्यासाठी महत्वाचं असतं आणि आपल्याला आपल्या मताच महत्व कळत नसल्याची खंत, शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय सावंत यावी व्यक्त केली. सभेत माजी महापौर जयश्री महाजन, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे यांनी देखील मनोगत व्यक्त करून करणदादा पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन केले.
प्रचार रॅलीला जोरदार प्रतिसाद
सभेपूर्वी महाविकास आघाडीच्यावतीने प्रभाग २ मध्ये प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी नगरातील छत्रपती शिवाजी महाराज यांना माल्यार्पण करून रॅलीला सुरुवात करण्यात आली. अमर चौक, साळुंखे चौक, बोहरा मस्जिद, रॉकेल डेपो, कोरडे गल्ली, हनुमान मंदिर, शिव मंदिर, मोठा मुंजोबामार्गे उस्मानिया पार्क येथे या रॅलीचा समारोप करण्यात आला. या ठिकाणी या रॅलीचे रूपांतर कॉर्नर सभेत करण्यात आले. रॅलीत प्रभाग २ मधील नागरिकांनी फटाक्यांची आतषबाजी आणि ठिकठिकाणी औक्षण करणदादा पाटील स्वागत केले.
1 thought on “जिल्ह्याच्या विकासासाठी एक संधी आम्हालाही द्या!”