साडेचार लाख हेक्टरवर कापूस लागवड

कृषी

जळगाव :- जिल्हा कृषी विभागाच्यावतीने खरीप हंगामातील पेरणीची आकडेवारी जाहीर करण्यात आली असून या आकडेवारीनुसार जिल्ह्यात तब्बल पाच लाख ५४ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या असून त्यापैकी साडेचार लाख हेक्टरवर कापूस लागवड करण्यात आली आहे.

जिल्ह्याचे खरीप हंगामाचे एकूण सरासरी क्षेत्र ७ लाख ६९ हजार ६०१ हेक्टर इतके आहे. मान्सून लांबल्याने यंदाच्या खरीप हंगामात जून महिना कोरडा गेला. त्यामुळे कापूस लागवडीस उशीर झाला, मात्र जुलै महिन्यापासून चांगला पाऊस पडण्यास सुरूवात झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या पावसामुळेच खरीप पेरण्यांना गती आली आहे.  जिल्ह्यात खरीप हंगामात ज्वारी, बाजरी, मका, इतर तृणधान्य, तूर, मूग, उडीद, इतर कडधान्य, भुईमूग, तीळ, सूर्यफूल, सोयाबीन , इतर गळीतधान्य, कापूस आदी प्रमुख पिके घेतली जातात.

अशी आहे पीकनिहाय पेरणी

खरीप ज्वारी – १३ हजार ९९ (२९ टक्के), बाजरी – ५ हजार ४७० (३५ टक्के), मका – ५१ हजार १५६ (६० टक्के), इतर तृणधान्य – ४४५ (२१ टक्के), तूर- ५ हजार १५५ (३१ टक्के), मूग – ८ हजार ६६५ (३१ टक्के), उडीद- ७ हजार १२३ (२७ टक्के), इतर कडधान्य – १८२ (१७ टक्के), भुईमूग — ४११ (१४ टक्के), तीळ-१५२ (८ टक्के), सूर्यफूल -१४ (२३ टक्के), सोयाबीन- ९ हजार ५६ (३१ टक्के) कापूस- ४ लाख ४५ हजार ७४७ (८९ टक्के) आहे.

तालुकानिहाय पेरणी हेक्टर क्षेत्र

जळगाव – २५०२६ (४४ टक्के), भुसावळ – २२२१४ (७७ टक्के), बोदवड – ३२९४९ (९९ टक्के), यावल-३३७२९ (७८ टक्के), रावेर- १६५७० (५६ टक्के), मुक्ताईनगर – १४५६६ (४९ टक्के), अमळनेर -५००८९ (७२ टक्के), चोपडा- ५४१४६ (८५ टक्के), एरंडोल -२९९९० (७६ टक्के), धरणगाव – १९२६७ (४३ टक्के), पारोळा- ४२४५९ (८२ टक्के), चाळीसगाव – ६२३७० (७२ टक्के), जामनेर -६८०१९ (६८ टक्के), पाचोरा -५३२७३ (९२ टक्के), भडगाव -३००९७ (८६ टक्के) पेरण्या झाल्या आहेत.

खताची टंचाई नाही

जिल्ह्यात खरीप हंगाम २०२३ साठी ३‎ लाख ५ हजार १४० मेट्रिक टन‎ रासायनिक खतांचे आवंटन‎ मंजुर करण्यात आले आहे. १ लाख ५७ हजार ९२ मेट्रिक टन‎ खत साठा उपलब्ध आहे. १८०० टन युरीया, २५५ टन डीएपी खतांचा बपर स्टॉक उपलब्ध आहे. खरीप पिके वाढीच्या अवस्थतेत आहेत. खतांची टंचाई नसून पुरेशा साठा विक्रीकरिता उपलब्ध आहे. अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी दिली आहे.

१ रुपयात पीकविमा

शासनाने २०२३-२४ पासून सर्वसमावेशक पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यात शेतकरी हिस्स्याचा विमा हप्ता रक्कम शासना मार्फत भरण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ १ रूपया भरून https://pmfby.gov.in वर स्वतः किंवा बँक, विमा कंपनी प्रतिनिधी व सामुहिक सेवा केंद्रामार्फत ३१ जुलै २०२३ पर्यंत अर्ज करावा. असे आवाहन कृषी उपसंचालक चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत