धान्य पिकवा, बक्षीस मिळवा; शेतकऱ्यांसाठी पीक स्पर्धेचे आयोजन

कृषी

सहभागी होण्याचे कृषी विभागाचे आवाहन

जळगाव :-  राज्यातील तृणधान्य, कडधान्य व गळीतधान्याचे उत्पादन वाढावे, यासाठी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांसाठी पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिक, धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यामधील खरीप हंगामातील पिकांसाठी ही स्पर्धा होणार असून स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांनी केले आहे.

प्रयोगशिल शेतकऱ्यांना मार्गदर्शन, इतर शेतकऱ्यांच्या पिक उत्पादनात वाढ करणे, शेतकऱ्यांचे मनोबल वाढविणे, पिकाच्या क्षेत्रात उत्पादन तंत्रज्ञानाचा प्रसार करणे व वाढ करणे हा या योजनेचा उद्देश आहे. स्पर्धेत खरीप हंगामामधील भात, ज्वारी, मका, नाचणी (रागी), तूर, मुग, उडीद, सोयाबीन, भुईमुग सूर्यफुल या पिकाचा अंर्तभाव केला आहे. मूग व उडीद पिकांसाठी ३१ जुलै,  भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी) तूर, सोयाबीन, भुईमुग व सुर्यफुल या पिकासाठी ३१ ऑगस्ट अंतिम दिनांक आहे.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पिकनिहाय प्रत्येकी ३०० रूपये शुल्क आकरण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्वतःच्या नावावर जमिनीचा ७/१२ व ८- अ  उतारा आवश्यक आहेत. तर आदिवासी शेतकऱ्यांकरिता जातीचा दाखला आवश्यक आहे.

तालुका पातळीवर प्रथम बक्षिस ५ हजार रूपये,  व्दितीय- ३ हजार रूपये , तृतीय – २ हजार रूपये बक्षिस आहे. जिल्हा पातळी प्रथम बक्षिस – १० हजार रूपये, व्दितीय- ७ हजार रूपये, तृतीय – 3 हजार रूपये, राज्य पातळी  प्रथम बक्षिस -५०  हजार रूपये,  व्दितीय- ४० हजार तृतीय –३० हजार रूपये आहे. खरीप हंगाम पीक स्पर्धेत सहभागी होणेसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयांना संपर्क साधावा. असे आवाहन श्री.वाघ यांनी केले आहे. 

1 thought on “धान्य पिकवा, बक्षीस मिळवा; शेतकऱ्यांसाठी पीक स्पर्धेचे आयोजन

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत