पाळधी ग्रामपंचायतीकडून दफनभूमीच्या जागेवर शौचालयाचे बांधकाम

सामाजिक

शौचालयाचे बांधकाम करून मृतदेहांची विटंबना केल्याने चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

पाळधी । वार्ताहर

पाळधी (खुर्द) ग्रामपंचायतीने अनुसूचित जातीतील समुदायासाठीच्या दफनभूमीवर जाणीवपूर्वक शौचालयाचे बांधकाम करून दफन विधी झालेल्या प्रेतांची विटंबना केली असून या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक अधिनियम १९८९ नुसार गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी किरण त्र्यंबक नन्नवरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

नन्नवरे यांनी या मागणीचे निवेदन नुकतेच जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहे. निवेदनात, पाळधी (खुर्द) ग्रामपंचायतीच्या हद्दीत राहणाऱ्या मागासवर्गीय व बौद्ध समुदायासाठी असलेल्या दफनभूमीवर जातीय आकसापोटी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शौचालयाचे बांधकाम करून दफन झालेल्या प्रेतांची विटंबना करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. शौचालयाच्या बांधकामासाठी खड्डे खोदताना दफन झालेल्या प्रेतांची हाडे वर निघत असतांनाही त्यांची विटंबना करून शौचालयाचे बांधकाम करण्यात आल्याचेही यात नमूद करण्यात आले आहे.

बांधकाम निष्कासित करा
ग्रामपंचायतीने शौचालयाचे बांधकाम विनाविलंब निष्कासित करून दफनभूमीचे पावित्र्य कायम ठेवावे. त्यासाठी दफनभूमीला भिंतीचे कंपाऊंट व प्रवेशद्वार तयार करण्यात यावे, अशी मागणीही किरण नन्नवरे यांनी केली आहे. ग्रामपंचायतीने या शौचालयाचे बांधकाम निष्कासित न केल्यास मागास व बौध्द समाजाच्या संयमाचा बांध फुटून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास, यास सर्वस्वी पाळधी खुर्द ग्रामपंचायत जबाबदार राहील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत