रस्त्याचे क्रॉंक्रीटीकरण करून देण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
जळगाव : शहरातील छत्रपती शिवाजीनगर भागातील रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून नागरिकांना चिखलातूनच वाट काढावी लागत आहे. या चिखलामुळे अनेकांना दुखापत देखील झाली असून रस्त्याचे क्रॉंक्रीटीकरण करून द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
जळगाव शहरातील छत्रपती शिवाजीनगर हा भाग शहरातील प्रमुख भागांपैकी एक असून या भागात लाकडांची प्रमुख बाजारपेठ आहे. त्यामुळे भागात नेहमी वर्दळ असते. असे असतांनाही मागील दहा ते पंधरा वर्षांपासून या भागातील रस्त्याचे काम करण्यात आलेले नाही. त्यामुळे या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. पावसामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल होऊन दुचाकी घसरण्याचा घटना घडत आहेत. यामुळे अनेकांना दुखापत देखील झालेल्या आहेत. या परिसरात शाळा देखील असल्याने विद्यार्थ्यांना देखील चिखलातून जावे लागत आहे. या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन रस्त्याचे क्रॉंक्रीटीकरण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदन देतांना धर्मरथ फाउंडेशनचे अध्यक्ष विनायक पाटील, विनोद पटेल, गणेश मोझर, पंकज नेवे, आनंद पांडे, धर्मेंद्र चौधरी, अकील पटेल, सतीश शिंदे, अकील पैलवान, पंकज पाटील, प्रफुल खानोरे, प्रवीण पटेल, किशोर पटेल, भावेश पटेल, शैलेश पटेल, उमेश पटेल यांसह लाकूडपेठ, पटेल वाडी, धनाजी काळे नगर व भुरे मामलेदार प्लॉट परिसरातील नागरिक उपस्थित होते.