Erandol Congress Meeting

एरंडोल-पारोळा विधानसभा मतदार संघ यावेळी काँग्रेसला मिळावा!

राजकारण

एरंडोल तालुका काँग्रेस कमिटीच्या बैठकीत कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा सूर

रडार लाईव्ह न्युज । रवंजे बु. वार्ताहर

विधानसभेच्या निवडणुकीत पारोळा तालुक्यातून आलटून-पालटून आमदार निवडून येतात. एरंडोल तालुक्याला संधी दिली जात नाही, त्यामुळे हा तालुका नेहमी दुर्लक्षित राहिला आहे. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत एरंडोल तालुका हा काँग्रेसलाच मिळावा, असा सूर एरंडोल तालुका काँग्रेस कमिटीच्या बैठकीत उमटला.

देशात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर आता काँग्रेसने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने दिलेल्या सूचनेनुसार जळगाव जिल्ह्यात तालुकानिहाय बैठकांना सुरुवात करण्यात आली आहे. बुधवार, दि.२६ रोजी एरंडोल तालुका काँग्रेस कमिटीची बैठक काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रतिनिधी विजय अण्णा महाजन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ही मागणी केली.

जिल्हा काँग्रेस कमिटीला सादर करणार अहवाल
बैठकीत एरंडोल तालुका निरीक्षक संदीप घोरपडे यांनी तालुक्याचा राजकीय आढावा घेतला तसेच उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मते जाणून घेतली. यावेळी काँग्रेससाठी एरंडोल तालुक्याची समीकरणे सकारात्मक असल्याचे सांगण्यात आले. तसेच महाविकास आघाडीने लोकसभेसाठी पारोळा तालुक्यातून उमेदवार दिला. आता येणाऱ्या विधानसभेत एरंडोल तालुका काँग्रेससाठी सोडावा, अशी मागणी करण्यात आली. दरम्यान, या बैठकीचा अहवाल जिल्हा कमिटीकडे सादर करण्यात येणार आहे.

काँग्रेसकडून ‘हे’ आहेत इच्छूक
एरंडोल तालुक्यातून काँग्रेस पक्षाकडून उमेदवारीसाठी प्रदेश प्रतिनिधी विजयअण्णा महाजन, प्रा. आर.एस. पाटील, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. फरहाज बोहरी इच्छुक असल्याचे सांगण्यात आले. बैठकीला डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. फरहाज बोहरी, लीगल सेलचे तालुकाध्यक्ष हिम्मतराव पाटील, अल्पसंख्यांक आघाडीचे तालुकाध्यक्ष शेख कलीम शेख हुसेन, तालुका उपाध्यक्ष नारायण मोरे, भरत पाटील, जिल्हा कार्यकारणी सदस्य सागर पाटील, रवींद्र पाटील, युवक काँग्रेसचे विधानसभा क्षेत्र प्रमुख इम्रान सय्यद, खजिनदार मदन भावसार, ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील, माजी शहराध्यक्ष संजय भदाणे, जिल्हा सरचिटणीस राजेंद्र पाटील, अनिल पाटील, पंडित महाजन, सुदर्शन महाजन, शेख सांडू शेख मोहम्मद, सय्यद अंजुम हाश्मी, इमरान सय्यद, साजिद शेख चांद यांसह सर्व सेल व फ्रंटलचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बैठकीचे सूत्रसंचालन एरंडोल तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुनील पाटील यांनी केले तर आभार शहराध्यक्ष प्रा. आर. एस. पाटील यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत