Loksabha Election 2024 : लोकशाही टिकविण्यासाठी आणि खोटारडेशाही बंद करण्यासाठी जनता सज्ज!

महाराष्ट्र राजकारण

महाविकास आघाडीचे उमेदवार करणदादा पाटील यांचे प्रतिपादन; नशिराबादला पार पडला मविआचा मेळावा

जळगाव : मागील १० वर्षात भाजपने दिलेले एकही आश्वासन पूर्ण झाले नाही. त्यांच्या भूलथापांना आपण कसे बळी पडलो, हे आता लोकांना समजतंय, आणि म्हणूनच लोकशाही वाचविण्यासाठी आणि खोटारडेशाही बंद करण्यासाठी जनता सज्ज झाली आहे, असे प्रतिपादन महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार करणदादा पाटील यांनी केले.

जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथे महाविकास आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा शुक्रवार, दि.२६ रोजी पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते. मेळाव्याला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, राष्ट्रवादीचे काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस एजाज मलिक, धरणगावचे माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी, रा. कॉ.चे जिल्हा उपाध्यक्ष वाल्मिक पाटील, तालुकाध्यक्ष बापू परदेशी, माजी सरपंच तथा विधानसभा क्षेत्र प्रमुख पंकज महाजन, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गोकुळ चव्हाण, माजी जि.प. सदस्य रवी देशमुख, राष्ट्रवादीचे बरकत अली, रमेश पाटील, बंडूदादा रत्नपारखी, रमेश चव्हाण, मनोज चौधरी, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष उन्मेष पाटील यांसह शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

करणदादा पाटील पुढे बोलतांना म्हणाले की, काँग्रेसने आरटीआयसारखे कायदे आणून सर्वसामान्यांचे हात बळकट केले. सर्व सामान्यमाणसाचे हात बळकट करण्यासाठी आणि खरी लोकशाही टिकविण्यासाठी केलेले एक तरी उदाहरण भाजपच्या नेत्याने दाखवावे, की हा निर्णय आम्ही घेतला. यांना विकासाशी, सर्वसामान्यांच्या प्रश्नांशी काही घेणे देणे नाही. आज शेतकऱ्याची काय वाताहत आहे? काय परिस्थिती आहे? यांच्या ताब्यात जिल्हा दूध संघ दिला, मात्र आता दूध उत्पादकांची काय परिस्थिती आहे? असा प्रश्न उपस्थित करून येत्या १३ तारखेला उन्हाचा विचार न करता जास्तीत जास्त असंख्येने घराच्या बाहेर पडून ‘मशाल’ या चिन्हासमोरील बटन दाबून मतदान करावे. आयुष्यभर चटके सहन करायचे नसतील तर एक दिवस उन्हाचे सहन करावे लागतील, घराच्या बाहेर पडून आपल्याला मतदान करावे लागेल, असे आवाहन त्यांनी केले.

तरुण बेरोजगार, शेतकरी उध्वस्त : गुलाबराव देवकर

मेळाव्यात बोलताना माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर म्हणाले की, भाजप काँगेसला ७० वर्षाचा हिशोब मागते. त्यांनी ७० वर्षात काय केलं त्यापेक्षा तुम्ही १० वर्षात काय केलं? याचा हिशोब द्या. १० वर्षात देशाची काय प्रगती झाली, हे जनतेला समजले आहे. काही वर्षांपूर्वी कापसाला ७ हजाराचा भाव मिळावा म्हणून, उपोषण, आंदोलन करण्यात आले. आता तर तुमचं सरकार आहे, द्या कापसाला भाव, असे आवाहन करून रोजगार नसल्याने तरुण उध्वस्त आणि शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी उद्धवस्त झाला आहे. शेतकऱ्याला उध्वस्त करण्याचे काम मोदी सरकारच्या माध्यमातून सुरु असल्याचा आरोप माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर याची केला. ही निवडणूक बदलाची निवडणूक असून आपल्या मतदार संघातून करणदादा पाटील यांना मोठ्या मताधिक्क्याने निवडून देण्याचे आवाहनही त्यांनी केले.मेळाव्यात, सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, धरणगावचे माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बापू परदेशी यांनी देखील मनोगत व्यक्त करून करणदादा पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन केले. मेळाव्याचे सूत्रसंचालन व आभार दीपक पाटील यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत