जळगाव : जिल्हा कोषागार कार्यालयातून निवृत्तीवेतन घेणाऱ्या सर्व निवृत्ती वेतनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांचे मासिक पेंशन हे यापुढे शासनाच्या ई-कुबेर (E-Kuber) प्रणालीमार्फत भारतीय रिझर्व बँकेतून (Reserve Bank of India) थेट पेंशन धारकांच्या खात्यात जमा होणार आहे, अशी माहिती जिल्हा कोषागार अधिकारी राजेंद्र खैरनार यांनी दिली.
पेंशन जमा करण्यासाठी जी बँक घेतली असेल त्याच खात्यातील आयएफएससी (IFSC) कोडनुसार पेंशन जमा होईल. जर काही पेंशनधारकांनी या कोषागार कार्यालयाची परवानगी न घेता परस्पर बँक खाते इतर जिल्ह्यात तसेच इतर बँकेत बदल करून घेतले असेल तर अशा पेंशन धारकांचे पेंशन जमा होण्यास अडचणी निर्माण होतील.
तरी ज्या पेंशन धारकांनी परस्पर बँक व बँक खात्यात बदल करून घेतले असतील त्यांनी त्यांचे मूळ बँक खाते ज्या ठिकाणी असेल तेच खाते सुरू ठेवावे. भविष्यात पेंशनबाबत अडचणी निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी पेंशन धारकांची राहील. जिल्ह्यातील सर्व निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्ती धारकांचे माहे मार्च-2024 या महिन्याचे मासिक पेंशन हे दिनांक 10 एप्रिल 2024 पर्यंत जमा होईल. याची सर्व पेंशनधारकांनी नोंद घ्यावी, असे जळगावचे जिल्हा कोषागार अधिकारी राजेंद्र खैरनार यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.