NMU

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात सर्वांगीणता – कुलगुरू

शैक्षणिक

जळगाव :- नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात (New National Education Policy) सर्वांगीणता आणि बहू आंतरविद्याशाखीय, नाविण्यपूर्ण संशोधन, अभ्यासक्रमात असलेली लवचिकता, क्रेडीट हस्तांतरण आदींचा समावेश असून यातून परिपूर्ण विद्यार्थी घडणार असल्याचे मत कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी पत्रकारांसाठी आयोजित कार्यशाळेत व्यक्त केले.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची ओळख पत्रकारांना व्हावी यासाठी संपादक/पत्रकारांची कार्यशाळा गुरूवार दि. २७ जुलै रोजी विद्यापीठात घेण्यात आली. या कार्यशाळेत कुलगुरू प्रा. माहेश्वरी यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे सादरीकरण केले. कौशल्य विकास आणि व्यावसायिक शिक्षणावर भर, बहू विद्याशाखीय अभ्यासक्रम, नाविणन्यतेला प्रोत्साहान, विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी आर्थिंक साहय्य , भारतीय भाषा वापरण्यास प्रोत्साहन, शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर, दुरस्थ आणि मुक्त शिक्षण, अध्ययन व अध्यापन प्रक्रियेचे डीजिटलायझेशन, आंतरराष्ट्रीय स्तरावर विद्यार्थी तयार व्हावा अशी काही महत्वाची ठळक वैशिष्ट्ये या शैक्षणिक धोरणाची सांगता येतील असे ते म्हणाले. राष्ट्रीय स्तरावर क्रेडीट एक असावे असा यामध्ये भर आहे. सामान्य आणि व्यावसायिक शिक्षणात असलेला भेद यातून दूर होणार आहे. क्रेडीट आणि अभ्यासक्रम आराखड्याची माहिती देतांना या वर्षापासून विद्यापीठातील प्रशाळा, संलग्न महाविद्यालयातील पदव्यृत्तर अभ्यासक्रम, स्वायंत्त महाविद्यालय यांना हे धोरण लागू करण्यात आले आहे. विद्यापीठात चार नवीन पदवी अभ्यासक्रम या धोरणानुसार सुरू करण्यात आले आहेत. चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रमाचा पर्याय विद्यार्थ्यांपूढे असेल त्याला ऑनर्स पदवी म्हटले जाईल. प्रत्येक विषयाचे क्रेडीट निश्चित केले जाईल. शिकतांना विद्यार्थ्याला मल्टीपल एन्ट्री आणि मल्टीपल एक्झीट काही अटींसह दिली जाणार आहेत मात्र नोंदणी झाल्यानंतर सात वर्षाच्या आत त्याने तो अभ्यासक्रम पुर्ण करायचा आहे. विद्यार्थ्याला प्रत्येक टप्यावर बाहेर पडतांना दहा क्रेडीटच्या दोन महिन्याची इंटर्नशिप आणि स्कीलकोर्स तसेच आवश्यक तेवढे क्रेडीट मिळवावे लागतील.

चार वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमात पहिल्यावर्षी प्रमाणपत्र, दुस-यावर्षी पदविका प्रमाणपत्र, तिस-यावर्षी पदवी प्रमाणपत्र आणि चौथ्यावर्षी संशोधन किंवा स्पेशेलाईझेशन पुर्ण झाल्यानंतर ऑनर्स पदवी मिळेल. मात्र प्रत्येक वर्षी दिलेले क्रेडीट पुर्ण करणे गरजेचे राहील. नवीन धोरणात विद्यार्थ्यांना विषय निवडीचे स्वातंत्र्य आहे. अभ्यासक्रमात मेजर आणि मायनर विभाग करण्यात आले आहेत. मायनरमध्ये आपल्या आवडीचा विषय विद्यार्थी घेवू शकेल. कौशल्य विकसित व्हावे यावर धोरणामध्ये भर देण्यात आला आहे. विद्यार्थ्याला प्रत्यक्ष अनुभव मिळावा म्हणून इंटर्नशिप बंधनकारक आहे. यावेळी श्री. माहेश्वरी यांनी इंडियन नॉलेज सिस्टीम त्याचे मोड्युल्स याविषयी माहिती दिली. दोन वर्षीय पदव्यृत्तरसाठी एक्झीटचा एक पर्याय असेल. यावेळी श्री. माहेश्वरी यांनी पत्रकारांच्या शंकाचे निरसन केले. या कार्यशाळेला प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, अधिष्ठाता प्रा. अनिल डोंगरे उपस्थित होते.

कार्यशाळेत केंद्रीय विद्यालय उमविचे प्राचार्य मॅथ्यू अब्राहम यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची केंद्रीय विद्यालयात केल्या जात असलेल्या अंमलबजावणीची माहिती दिली. या नवीन धोरणाप्रमाणे पहिल्या वर्गात सहा पेक्षा अधिक वयोगटातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात आहे. पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास कसा होत आहे याची सविस्तर माहिती लिंक द्वारे पुरविली जाते. निपुण भारत अंतर्गत सर्व सूचनांचे पालन केले जात आहे. तीन बाल वाटीकावर्ग सुरु करण्यात आले आहेत. तीन महिन्याचे खेळांवर आधारीत  मोड्यूल विद्याप्रवेश या नावाने सुरु करण्यात आले आहे. कौशल्यावर आधारीत विषयाचे ज्ञान विद्यार्थ्यांना दिले जात असून शिक्षकांना देखील प्रशिक्षण देण्यात येत आहे. विद्यांजली पोर्टल सुरु करण्यात आले आहे अशी माहिती श्री. मॅथ्यू यांनी दिली. भुसावळ येथील केंद्रीय विद्यालय आणि नवोदयांची माहिती प्राचार्य नितीन उपाध्याय आणि विजय अंभोरे यांनी दिली. यावेळी मिनाक्षी पाटील उपस्थित होत्या.

1 thought on “नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात सर्वांगीणता – कुलगुरू

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत