मारहाणप्रकरणी भाजपच्या ‘त्या’ आमदारावर अखेर गुन्हा दाखल

गुन्हे महाराष्ट्र

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यासह पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी भारतीय जनता पार्टीचे आमदार सुनील कांबळे यांच्यावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी ससून रुग्णालयातील कोनशिलेवर नाव नसल्याच्या कारणावरून आ. कांबळे यांनी दोघांना मारहाण केली होती.  दरम्यान, या मारहाणीचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे शुक्रवारी पुण्याच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या उपस्थितीत ससून रुग्णालयातील तृतीय पंथीय वार्डाच्या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला माजी मंत्री हसन मुश्रीफ, सुनील तटकरे, आमदार रवींद्र धंगेकर, आमदार सुनील कांबळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, रुग्णालयातील कोनशिलेवर नाव नसल्याच्या कारणावरुन आमदार सुनील कांबळे यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याशी वाद घालत मी स्थानिक आमदार असूनही माझे नाव जाणीवपूर्वक वगळल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आ. कांबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैद्यकीय कक्षाचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र सातव यांना मारहाण केली. त्यानंतर व्यासपीठावरुन उतरल्यावर एका पोलीस कर्मचाऱ्याच्या कानशिलात देखील लगावली होती.

रात्री उशिरा गुन्हा दाखल

मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाल्यानंतर तसेच माध्यमांमध्ये बातम्या आल्यानंतर विरोधकांनी आ. कांबळे यांच्यावर चांगलीच टीका केली. त्यानंतर रात्री उशीरा आ. सुनील कांबळे यांच्यावर बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

फक्त ढकलले ; आ. कांबळे यांचे स्पष्टीकरण

दरम्यान, या प्रकरणात आमदार सुनील कांबळे यांनी स्पष्टीकरण दिले असून आपण फक्त त्या व्यक्तीला ढकलले. कोणालाही मारहाण केली नाही. कानाखाली वाजवली नाही. माझे आयुष्य झोपडपट्टीत गेले आहे. कानाखाली कशी वाजवतात, हे मला चांगलेच माहिती आहे. असे त्यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत