अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी प्रशासनाचे पाऊल; वाळू माफियांची मुजोरीला बसणार आळा
जळगाव :- जिल्ह्यात अवैधरित्या होणारी वाळू वाहतूक व वाळू माफियांची वाढती दादागिरी रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पाऊले उचलायला सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील वाळू घाटांना आता सशस्त्र सुरक्षा पुरविण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला असून महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्सचे एक पथक जळगावात दाखल झाले आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे वाळू माफियांच्या मुजोरीला आळा बसणार असून प्रशासनाच्या महसुलात देखील वाढ होणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून अवैधरित्या होणाऱ्या वाळू वाहतुकीचा विषय गंभीर झाला आहे. कमी मेहनतीत अधिक पैसा येत असल्याने अनेक लहान मोठे वाळू माफिया सक्रिय झाले होते. महसूल व पोलीस प्रशासनाला देखील ते जुमानत नसल्याचे चित्र जिल्ह्यात निर्माण झाले होते. असे असतानाही ही अवैधरित्या होणारी वाळू वाहतूक रोखण्यासाठी कोणतेही ठोस उपाय होताना दिसत नव्हते. दरम्यान, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी अवैधरित्या होणारी वाळू वाहतूक थांबविण्यासाठी जिल्हयातील वाळू घाटांवर सशस्त्र जवान तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे.
पथक जिल्ह्यात दाखल
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी गेल्या आठवड्यात महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्सच्या महासंचालकांशी चर्चा केली होती. त्यानुसार नाशिक विभागाचे प्रमुख त्रंबक पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक पथक जळगावात दाखल झाले असून अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन व पथकाकडून या वाळू घाटांची पाहणी केली जात आहे. दोन दिवसात या घाटांची पाहणी करून किती मनुष्यबळ उपलब्ध करायचे यावर निर्णय घेण्यात येणार आहे.
जागेवरच होणार कारवाई
सध्या २८ घाटांना संरक्षण पुरविण्यात येणार असून घाटांची संख्या वाढण्याची शक्यता देखील प्रशासनाकडून वर्तविण्यात आली आहे. घाटांवर तैनात जवानांकडून जागेवरच कारवाई केली जाणार आहे. गैरप्रकारांची माहिती संबंधित तहसीलदार, प्रांताधिकारी व जिल्हाधिकारी यांना तातडीने कळविता यावे, यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने पोलीस पाटील यांच्यासाठी एक ॲप विकसित केले जाणार असल्याचेही जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
1 thought on “वाळू घाटांना राहणार सशस्त्र सुरक्षा”