तालुका प्रतिनिधी । धरणगाव
तालुक्यातील आनोरे, धानोरे, गारखेडे, बाभळे, गंगापुरी, पष्टाणे शिवारात रिपरिप पावसामुळे खरीपच्या पिकांवर रोगांच्या प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तालुक्यात ढगाळ वातावरण व रिपरिप पावसामुळे पाच दिवसांपासून सूर्यदर्शन नसल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. त्यामुळे आता पिकांना उन्हाची आवश्यकता आहे.
खरिपच्या पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. पिकांपुरता पाऊस पडत असला तरी विहिरींच्या पाणी पातळीत मात्र पाहिजे त्या प्रमाणात वाढ झालेली नाही. परंतु, कपाशी, ज्वारी पिकांवर या रिपरिप पावसाचा चांगलाच परिणाम दिसून येत आहे. कपाशी पिकावर मावा, तुडतुडे, आळीचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात झालेला असून बुरशीही मोठ्या प्रमाणात पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक फवारणी करावी लागत आहे. परंतु, पाऊस बंद होत नसल्यामुळे फवारणीचा देखील परिणाम या पिकांवर होत नसून तणकट देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
पावसामुळे तण वाढल्यामुळे तसेच वापसा होत नसल्यामुळे मात्र शेतकऱ्यांची चांगलीच पंचायत झालेली आहे. रिमझिम पाऊस पडत असल्याने कपाशीच्या फुलपात्यांमध्ये पाणी साचून फुलपाती गळण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. त्यामुळे आता पावसाने मशागतीसाठी सवळ द्यावी, अशी अपेक्षा शेतकरी वर्गाकडून व्यक्त होत आहे.