इतर मागास बहुजन कल्याण विभाग धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी राबवतेय ही योजना; आजच घ्या लाभ
जळगाव : पाल्यांच्या शिक्षणाची चिंता असलेल्या धनगर समाजातील (भटक्या जमाती–क) पालकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे धनगर समाजातील विद्यार्थ्यांना 2024-25 या शैक्षणिक वर्षात प्रवेश देण्याची योजना राबविण्यात येत आहे. ही योजना नेमकी आहे काय?, काय आहेत पात्रतेच्या अटी, शर्ती?, संपर्क कुठे करायचा? या तुम्हाला पडलेल्या साऱ्या प्रश्नाची उत्तरे आपण जाणून घेणार आहोत.
धनगर समाजाच्या (भटक्या जमाती–क) पहिली व दुसरीच्या वर्गात प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात प्रवेश देण्याची योजना इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे राबविण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत दगडाबाई चंपालालजी बियाणी संचलित बियाणी पब्लिक स्कूल (इंग्रजी माध्यम) भुसावळ, जि. जळगाव या निवासी शाळेची निवड शासनाने केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले आहे.
प्रवेशासाठी अशा आहेत अटी व शर्ती
इच्छुक विद्यार्थी धनगर समाजाचा (भटक्या जमाती–क) असावा, विद्यार्थ्याच्या पालकाने विद्यार्थ्याच्या नावे सक्षम अधिकाऱ्याने दिलेला धनगर समाजाच्या (भटक्या जमाती–क) दाखल्याची साक्षांकित प्रत व मूळ प्रत तपासण्यासाठी सादर करावी, विद्यार्थी दारिद्रयरेषेखालील असेल, तर त्यासंबंधित यादीतील अनुक्रमांक व दाखला सादर करावा, या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या मुलांच्या पालकांच्या कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाची कमाल मर्यादा एक लाख रुपये राहील. पहिलीसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याचे वय 10 जून, 2024 रोजी सहा वर्षे पूर्ण असावे, दुसरीच्या वर्गात प्रवेशासाठी सदर विद्यार्थी सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात पहिलीमध्ये शाळेत प्रवेशित असल्याबाबतचे बोनाफाईड अर्जासोबत जोडावे, विद्यार्थ्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावे, विद्यार्थ्याचे पालक शासकीय / निमशासकीय नोकरदार नसावेत, निवासी शाळेत राहणाऱ्या विदयार्थ्याना वर्षातून दोनदा पालकांना भेटण्याकरीता प्रवास खर्च देण्यात येईल. विधवा / घटस्फोटीत / निराधार / परित्यक्ता व दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्याची प्राधान्याने निवड करण्यात येईल.
या ठिकाणी साधा संपर्क
प्रवेश अर्जासाठी सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय जळगाव पत्ता – डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, मायादेवी मंदिरासमोर महाबळ रोड जळगाव येथे आकाश साबळे ( 8855909694) व मिलींद पाटील (7972765955 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण योगेश पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.