उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जाऊ नये; बैठकीत ठराव करत घेतली प्रतिज्ञा
मुस्तकीम बागवान | एरंडोल तालुका प्रतिनिधी
महविकास आघाडीचा (Maha Vikas Aaghadi) जागा वाटपाचा तिढा सुटला असून उमेदवार देखील जाहीर करण्यात आले आहेत. मात्र, यावरून एरंडोल तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) उमेदवार डॉ. सतीश पाटील (dr. Satish Patil) यांच्या विरोधात त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून रविवारी झालेल्या तालुका काँग्रेसच्या बैठकीत डॉ. सतीश पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जाऊ नये, असा फतवा काढण्यात आला आहे. यामुळे एरंडोल तालुक्यात ऐन निवडणुकीत काँग्रेस (Congress) विरुद्ध राष्ट्रवादी (शरद पवार गट) (Rashtrawadi Congress) असा संघर्ष पाहायला मिळणार आहे.
महाविकास आघाडीच्या जागा वाटपात एरंडोल-पारोळा मतदार संघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली आहे. मात्र, यावरून एरंडोल तालुका काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज झाले असून त्यांनी डॉ. सतीश पाटील यांच्या विरोधात शड्डू ठोकायला सुरुवात केली आहे. रविवारी एरंडोल तालुका काँग्रेसची बैठक प्रदेश काँग्रेस प्रतिनिधी विजय महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीत राष्ट्रवादी (शरद पवार गट) चे उमेदवार डॉ. सतीश पाटील यांच्या उमेदवारीवरून असंतोष व्यक्त करण्यात आला. आतापर्यंत झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत डॉ. सतीश पाटील यांनी पक्षाला व पक्षाच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले नाही. त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे दोन गट झालेले असल्याने त्यांच्याकडे आता मोजकेच कार्यकर्ते राहिले आहेत. त्यांचा जनसंपर्क देखील राहिलेला नाही. माघारीपर्यंत पक्षांमध्ये उमेदवारीबाबत घडामोडी घडण्याची शक्यता असल्याने तसेच शिवसेना (ठाकरे गट) ने देखील उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याने काँग्रेस देखील एबी फॉर्म मिळाल्यास अर्ज भरणार असल्याचे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. दरम्यान, या सर्व बाबींच्या विचार करून कार्यकर्त्यांनी डॉ. सतीश पाटील यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यास जाऊ नये, असा ठराव करून प्रतिज्ञा घेण्यात आली. यावरून एरंडोल तालुक्यात काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.
बैठकीला तालुकाध्यक्ष सुनील पाटील, रवींद्र पाटील, योगेश सोनवणे, सागर पाटील, बबन वंजारी, राजेंद्र पाटील, सुदर्शन महाजन, तीर्थानंद ठाकूर, भिकमचंद महाजन, सय्यद इमरान, कमर अली सय्यद, पंडित महाजन, संजय नेटके, मदनलाल भावसार, कासोदा शहराध्यक्ष समाधान चौधरी, डॉ. प्रशांत पाटील, सुरेश पवार, चेतन पाटील, सागर पाटील, करीम शेख यांसह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.