महसूल सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांचे प्रतिपादन
जळगाव :- महसूल विभागात पारंपरिक पध्दतीने चालणारे कामकाज आता कालबाह्य झाले असून तंत्रज्ञानाच्या मदतीने महसूल विभागाच्या सेवा अधिकाधिक लोकाभिमुख होत गतिमानतेने नागरिकांपर्यंत पोहचत आहेत, असे प्रतिपादन नाशिक विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले.
महसूल सप्ताहानिमित्त आयोजित युवा संवाद कार्यक्रमात त्यांनी नूतन मराठा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधाला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, नूतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन आदी उपस्थित होते.
श्री.गमे पुढे बोलतांना म्हणाले की, महसूल विभागाच्या सेवा ऑनलाईन होत आहेत. यामुळे नागरिकांना आता तलाठी, तहसील कार्यालयाच्या चकरा मारण्याची गरज नाही. महाभूमी अभिलेख संकेतस्थळावर काही सेकंदात डिजिटल सातबारा डाउनलोड करता येतो. सातबारामधील क्लिष्ट बाबी वगळून तो सर्वसामान्यांना समजेल असा भाषेत तयार करण्यात आला आहे. महसूलविषयक ऑनलाईन सेवांची माहिती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे हा महसूल सप्ताहाचा मुख्य उद्देश असल्याचेही ते यावेळी म्हणाले. कार्यक्रमात विविध योजनांच्या लाभार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.